प्रामाणिकतेचा परिचय : प्रफुल्ल घवळे यांचा प्रेरणादायी प्रयत्नअमरावती : पैसे आणि महत्त्वाचे कागदपत्र असलेले पाकीट सापडल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता पोलिसांच्या स्वाधीन करून मूळ मालकास परत देण्याचा प्रामाणिकपणा दिवाळीच्या दिवशी पाहावयास मिळाला. प्रफुल्ल माणिकराव घवळे असे त्या युवकाचे नाव आहे. रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास प्रफुल्ल घवळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गर्ल्स हायस्कूल चौकाकडे जात असताना बीएसएनएल टॉवरजवळ वर्दळीच्या ठिकाणी पैशांनी भरलेले पाकीट बेवारस पडलेले दिसले. ते पाकीट उचलले व कोणाचे असेल तर परत येईल, या आशेने दहा मिनिटे त्यांनी तिथेच वाट बघितली. परंतु कुणीच न आल्याने क्षणाचाही विलंब न करता त्यांनी गाडगेनगर ठाण्यात त्यांनी ते पाकीट जमा केले. पाकीटमध्ये सहा हजार सहाशे रुपये रोख, विविध बँकांचे एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, पॅनकार्डसह इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. पोलिसांनी त्वरित कार्यवाही करीत मूळ मालक नवीन श्यामराव वानखडे (रा. टेंभुर्णा (ता. वरुड) यांच्याशी संपर्क करीत त्यांना पाकीट परत केले. पोलीस व नवीन वानखडे यांनी प्रफुल्ल घवळे यांचे आभार व्यक्त केले. प्रफुल्ल घवळे हे एका वृत्तपत्राचे व्यवस्थापक असून पत्रकार संघ तसेच विविध सामाजिक संस्थांशी जुळलेले आहेत. शहरात चोरी सारख्या घटना वाढल्या असताना एका सामान्य युवकाने दाखवलेली ही तत्परता नक्कीच प्रेरणादायी आहे. (प्रतिनिधी)
रस्त्यावर पडलेले पैशाचे पाकीट दिले परत
By admin | Updated: November 2, 2016 00:24 IST