(असाईनमेंट)
अमरावती : सर्वच प्रकारची दहा रुपयांची नाणी वैध असताना अधूनमधून पसरणाऱ्या अफवांमुळे नागरिकांसह व्यावसायिकही त्रस्त झाले आहेत. नोटांच्या तुलनेत नाण्यांचे आयुष्य जास्त असल्यामुळे बँकांद्वारे अधिकाधिक नाण्यांवर भर देण्यात येत आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, दहा रुपयांची सर्वप्रकारची नाणी वैध चलनात असल्याचे आवाहन बँकांद्वारे करण्यात आले आहे.
बॉक्स
कुठल्याच नाण्यावर बंदी नाही
आरबीआयद्वारा जारी करण्यात आलेल्या नाण्यांमध्ये संसद भवन, मध्यभागी १० चा आकडा असलेले नाणे, डॉ. होमी भाभा यांचे छायाचित्र असलेले नाणे, याशिवाय माहात्मा गांधी यांचे छायाचित्र असलेले नाणे आदी सर्व दहाची नाणी चलनात आहेत. दहा रुपयांच्या कुठल्याच नाण्यावर बंदी नाही व ही सर्व नाणी वैध असल्याचे बँकांद्वारे सांगण्यात आले.
बॉक्स
कोणती नाणी नाकारतात?
अनेक नागरिक व लहान व्यावसायिकांच्या मते, ज्या दहाच्या नाण्यावर दहाचा आकडा खालच्या बाजूला व वरच्या बाजूला अशोकस्तंभ आहे, ती नाणी वैध आहेत. मात्र, असे काही नाही, या नाण्यांचा स्टॉक जास्त आहे. याशिवाय आरबीआयद्वारे वेळोवेळी विविधता असलेली नाणी बाजारात आणली जातात व ती सर्व वैध असल्याचे बँकांनी सांगितले.
बॉक्स
बँकांमध्ये नाण्यांचा मोठा साठा
१) बँकामध्ये दहाच्या नाण्यांचा तुटवडा नाही. अनेकदा व्यावसायिकांनाद्वारा या नाण्यांची मागणी केली जाते व त्यांना पुरवठाही करण्यात येतो.
२) दहा रुपयांच्या जुन्या नोटा खराब होत असल्याने हाताळणे कठीण जाते. त्यामुळेही नाण्यांचा वापर जास्त करण्यात येत असल्याचे दिसून येते.
कोट
पैसा असून अडचण
अनेकदा भाजीविक्रेते दहा रुपयांचे कॉईन घ्यायला नकार देतात. विशिष्ट प्रकारची दहाची नाणी स्वीकारली जात नसल्याचे त्यांच्याद्वारा सांगण्यात येते. तीच नाणी दुकानात मात्र स्वीकारली जातात.
- सुलोचना पाटील, गृहिणी
दहाच्या नाण्याबाबत बऱ्याचदा संभ्रमाची स्थिती होते. कधी स्वीकारली जातात, तर कधी नाकारल्या जातात. एखादेवेळी पानठेल्यावर व कधी ऑटोरिक्षाच्या भाड्यासाठी असे अनुभव आले आहेत.
- रोशन धर्माळे, नागरिक
कोट
दहा रुपयांची सर्व प्रकारची नाणी वैध आहेत व चलनात आहेत. नागरिक व व्यावसायिकांनी ही सर्व नाणी स्वीकारावी, याविषयी तक्रार आल्यास आरबीआयच्या नाॅर्म्सनुसार कारवाई करण्यात येते.
- जितेंद्र झा, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक