लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य सरकारने ज्येष्ठ कलावंतांसाठी सुरू केलेली पेन्शन योजना सध्या थंडबस्त्यात पडली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक जिल्हास्तरीय समितीची स्थापना १५ महिन्यानंतरही झालेली नाही. त्यामुळे नव्याने अर्ज केलेल्या एकाही ज्येष्ठ कलावंताला या योजनेचा लाभ मिळालेला नाही.
राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि स्थानिक कलावंत या तीन वर्गवारीमध्ये पेन्शन योजना राबविण्यात येते. १९५४-५५मध्ये या योजनेला सुरुवात झाली. त्यात काळानुरूप आवश्यक ते बदल करून सर्व नियमांमध्ये सुसूत्रता आणण्यात आली. त्यानुसार राष्ट्रीय कलावंताला महिन्याकाठी २,१०० रुपये, राज्यस्तरीय कलावंताला १,८०० रुपये स्थानिक कलावंताला १,५०० रुपये पेन्शन मिळते. जिल्हास्तरावर जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी तर तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांच्यामार्फत या योजनेंतर्गत मानधन मिळण्यासाठी अर्ज करावा लागतो. काही वर्षांपासून ही योजना व्यवस्थित सुरू होती. त्यानंतर कोरोना काळात योजना रखडली. २०२० या संपूर्ण वर्षभरात अमरावतीच नव्हे तर राज्यात एकाही जिल्ह्यातील पात्र कलावंतांची नवीन यादी जाहीर करण्यात आलेली नाही. शासकीय अनास्थेमुळे अजूनही सर्व जिल्ह्यांतील हजारो पात्र कलावंत या योजनेपासून वंचित आहेत. ही स्थिती आजही कायम आहे.
बॉक्स
समाजकल्याणमध्ये अर्ज पडृून
कलावंतांची निवड समिती गत दीड वर्षांपासून स्थापन करण्यात आलेली नाही. याकडे संबंधित लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. समितीची स्थापना होऊ न शकल्यामुळे अद्यापही शेकडो अर्ज जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत पडून आहेत.