अमरावती : ऐन दिवाळीच्या तोंडावर गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे संतप्त ग्राहकांनी गॅस एजंसीच्या कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. प्रकरण चिघळण्याची शक्यता असतानाच पोलिसांनी लागलीच धाव घेतल्याने परिस्थिती आटोक्यात आली. दिवाळीच्या तोंडावर गॅस सिलिंडरची मागणी वाढली आहे. त्यातच रविवारी सुटीच्या दिवशी सिलिंडरचा पुरवठा बंद असतो. मतदानाच्या दिवशीदेखील सिलिंडरचा पुरवठा केला गेला नाही. सोमवारी गॅस एजंसीच्या कार्यालयासमोर सिलिंडर मिळण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गोळा झाले होते. सकाळी सिलिंडर भरून ट्रक या ठिकाणी आला. यापूर्वीच नोंदणी केलेल्या ग्राहकांना सिलिंडर वितरित करण्यात आले. मात्र ग्राहकांची संख्या अधिक असल्याने उर्वरित ग्राहक ांना सिलिंडर मिळू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना सिलिंडरपासून वंचित राहावे लागले. सिलिंडर हे जीवनाचा अविभाज्य अंग असल्याने ते मिळविण्यासाठी ग्राहकांनी एजंसीच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला. हा वाद विकोपाला जाताच ग्राहकांनी गॅस एजन्सीच्या कार्यालयावर दगडफेक केली. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. दिवाळीच्या तोंडावर गॅस स्लििंडरची टंचाई जाणवू लागल्याने ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत होता. (तालुका प्रतिनिधी)
मोर्शीत गॅस एजन्सीच्या कार्यालयावर दगडफेक
By admin | Updated: October 20, 2014 23:04 IST