आदर्श, प्रेरणादायी : माता-पित्यांंंचे स्वप्न पूर्ण करण्याची धडपडअमरावती : वडिलांचे पाय अधू झालेले. आईला श्वासाचा आजार. त्यामुळे त्यांना पंढरीची वारी करता आली नाही. कधी परिस्थितीचा अडसर आला तर कधी तब्येतीचा. पंढरीच्या वारीचे स्वप्न अपूर्णच राहणार की काय? असे वाटत असताना ‘त्या’ आधुनिक श्रावणबाळाने चक्क हातगाडीवर बसवून आपल्या वृध्द माता-पित्यांना पंढरीची वारी घडवून आणण्याचा चंग बांधलाय.एकीकडे वृध्दाश्रमांची संख्या वाढत चालली आहे. चौकोनी कुटुंबात उच्चशिक्षित मुलांना देखील जन्मदात्यांचा अडसर होतोय. पण, शहरातील राजापेठ परिसरातील बंडू बळीराम गव्हाळे नामक अल्पशिक्षित फळविक्रेत्याने मात्र मातृ-पितृ ऋणातून उतराई होण्यासाठी चालविलेली धडपड सध्याच्या ‘हायटेक’ जमान्यातील संकीर्ण वृत्तीच्या नव्या पिढीसाठी आदर्श ठरावी अशीच आहे. बंडू गव्हाळे यांचे वडील बळीरामजी पायाने अधू आहेत. पायी चालणे त्यांना शक्य नाही. तर आई नर्मदाबार्इंना श्वसनाचा त्रास आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे उराशी बाळगलेले पंढरीच्या वारीचे आपले स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाही, असे त्यांना वाटत होते. परंतु जन्मदात्यांना विठुरायाचे दर्शन घडविण्याचा निर्धार बंडू यांनी केला. त्यासाठी त्यांनी हातगाडीचा वापर केला. उन-पावसापासून जन्मदात्यांचे रक्षण व्हावे, यासाठी फळगाडीवर वापरली जाणारी छत्री वापरण्याची क्लृप्ती लढविली. त्यावर माता-पित्यांना बसवून त्याचा अमरावती-पंढरपूर हा तब्बल महिनाभराचा प्रदीर्घ प्रवास सुरू झाला आहे.माता-पिता के चरणों मे चारों धामअकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील मूळ रहिवासी असलेल्या बंडू बळीराम गव्हाळे सतत कबिराचे दोहे गुणगुणत असतात. त्यात ‘माता-पिता के चरणों में चारो धाम’ हा दोहा त्यांच्या तोंडी असतो.
हातगाडीवरून पंढरीची वारी घडविणारा आधुनिक श्रावणबाळ!
By admin | Updated: June 27, 2015 00:18 IST