अकोला : मागास भागातील मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी ह्यमॉडेल कॉलेजह्ण ही संकल्पना विद्यापीठ अनुदान आयोगाने आणली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत हे मॉडेल कॉलेज बुलडाणा येथे सुरु करण्यात येत आहे. याकरिता विद्यापीठाने जागेच्या भाड्यासाठीचे प्रस्ताव मागविले आहेत. त्यामुळे यावर्षीपासून मॉडेल कॉलेज सुरू होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. मागास परिसरातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मॉडेल कॉलेज ही संकल्पना मांडली. केंद्र आणि राज्य यांच्या समन्वयातून हे मॉडेल कॉलेज चालविण्याचे ठरविण्यात आले होते. केंद्र शासनाने विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत त्यांना जी रक्कम विद्यापीठाला द्यायची होती, त्यातील अर्धी रक्कम दिली आहे; परंतु राज्य शासनाकडून अद्याप रक्कम मिळायची आहे. मॉडेल कॉलेज सुरू करणे नियमानुसार आवश्यक असल्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने मॉडेल कॉलेज सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाने बुलडाणा येथे भाड्याच्या जागेतच मॉडेल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी प्रस्तावदेखील मागविले आहेत. यामध्ये ६ प्रशस्त खोल्या किंवा हॉल ज्यामध्ये ८0 विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था करता येईल, असे अपेक्षित आहे. संचालकांचे कार्यालय, इतर कर्मचारी व स्टॉफ करिता ३ खोल्या किंवा १ मोठा हॉल, संगणक व प्रयोगशाळेकरिता २ खोल्या, शौचालयाची व्यवस्था असावी, पार्किंगकरिता जागा आणि वीज व पाण्याची व्यवस्था, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. विद्यापीठाला हवी असलेली जागा उपलब्ध असणार्या व भाड्याने देण्यास इच्छुक असणार्यांना इमारतीचा नकाशा, लेआऊट व इमारत मान्यतेच्या प्रतिसह २१ जुलैपर्यंत आपले प्रस्ताव विद्यापीठात सादर करावयाचे आहेत.इमारत उपलब्ध झाल्यास याच सत्रापासून अमरावती विद्यापीठाचे मॉडेल कॉलेज बुलडाणा येथे सुरू होऊ शकते.
बुलडाण्यात सुरू होणार मॉडेल कॉलेज
By admin | Updated: July 13, 2014 21:38 IST