शासन निर्णय : प्रतिदिवस १८१ रुपये रोजंदारी मिळणारअमरावती : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनामार्फत राबविली जाणाऱ्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) केले जाणाऱ्या कामांच्या मजुरीतही वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ एप्रिलपासून सर्वत्र लागू करण्यात आली आहे. ही योजना सर्वाधिक हरियाणा या राज्यात असून केरळमध्ये सर्वाधिक १७ रुपयांची वाढ केली आहे. महाराष्ट्रात १३ रुपयांची वाढ करुन ती प्रतिदिवस १८१ रुपये एवढी करण्यात आली आहे. यामुळे मनरेगाच्या मजुरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मनरेगाच्या नवव्या वर्धापण दिनाच्या कार्यक्रमात केंद्रीय ग्रामीण विकास मंत्र्यांनी घोषणा केली होती. त्यानुसार केंद्र शासनाने परिपत्रक काढून दरवाढ केली आहे. ही दरवाढ महाराष्ट्रासह इतरही राज्यात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे १०० दिवसांचे रोजगार देता यावा म्हणून मनरेगाची शासनाने सुरुवात केली. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधणे, शेततळी, रस्त्यांची कामे, फळझाडांची लागवड करणे, सांडपाणी, स्वच्छतेची कामे, चर खोदणे, पाझर तलावातील गाव उपसा आदी कामे या योजनेतून केली जातात. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना हक्काचा रोजगार मिळतो. मात्र योग्य मोबदला मिळत नव्हता. मात्र मनरेगाची कामे करणाऱ्या मजुरांना केंद्र शासनाच्या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत मनरेगामध्ये मजुरांना १६८ रुपये प्रतिदिवसाची रोजंदारी मिळत होती. आता मात्र १ एप्रिलपासून मजुरांना प्रतिदिवस १८१ रुपये मजुरी मिळणार आहे. यामध्ये १६८ रुपयांत केंद्रशासनाने १३ रुपयांची वाढ केली आहे. (प्रतिनिधी)
‘मनरेगा’च्या मजुरीत १३ रुपयांची वाढ
By admin | Updated: April 21, 2015 00:07 IST