अमरावती : एका अल्पवयीन मुलीला प्रेमजाळात अडकवून तिला फूस लावून पळविल्याची घटना फ्रेजरपुरा हद्दीत मंगळवारी उघडकीस आली. अल्पवयीन मुलगी दहावीत शिकत असून, ती मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती परतली नाही. दरम्यान मुलीला एका तरुणाने पळवून नेल्याचे कुटुंबीयांना आढळून आले. त्यामुळे त्यांनी या घटनेची तक्रार फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला. 0000000000000000000000000000
चाकू, तलवार घेऊन दहशद
अमरावती : चाकू व तलवार हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या दोघांना गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी विविध परिसरातून अटक केली. सोहन मोहन इंगळे (रा. बोरगाव पेठ, ता. अचलपूर) आणि गोलू ऊर्फ सूरज महेश पाली (रा. चपराशीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. गाडगेनगरचे पीएसआय राजेंद्र जठाळे यांचे पथकाने सिध्दार्थनगरातून सोहन इंगळेला तलवारसह अटक केली, तर तपोवन गेटसमोर गोलू पालीला चाकूसह ताब्यात घेतले.
000000000000000000000000000
चाकूचा धाक दाखवून मुलीची छेडखानी
अमरावती : चाकूचा धाक दाखवून माझ्यासोबत चल, अशी धमकी देऊन एका तरुणीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना फ्रेजरपुरा हद्दीतील यशोदानगरात मंगळवारी उघडकीस आली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमन देवळेकर (रा. यशोदानगर) विरुद्ध गुन्हा नोंदविला. या घटनेचा प्राथमिक तपास पीएसआय प्रशांत जंगले यांनी केला.
00000000000000000000000
इसमाला मारहाण करून लुटले
अमरावती : एका इसमाला मारहाण करून त्याच्या खिशातील ४ हजार २०० रुपये जबरीने हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी लक्ष्मीनगरात घडली. शेख फिरोज शेख सयदू (५० रा. लक्ष्मीनगर) हा राजकमलवरून प्रवीणनगरात जात होता. त्यावेळी त्याला सूरज तिवारी आणि पंकज ऊर्फ गुणवंत टेकाम यांनी रस्त्यात हात दाखवून थांबविले. त्यानंतर त्यांनी दारू पिण्यासाठी शेख फिरोजला पैसे मागितले. त्याने पैसे नाही, असे म्हटल्यानंतर आरोपींनी शेख फिरोजला मारहाण केली. त्याच्याजवळील रोख हिसकावून घेतली. घटनेची तक्रार शेख फिरोजने गाडगेनगर ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला.