परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना वन्यजीव विभागातील जारिदा वनपरिक्षेत्रातील खंडुखेडा वर्तुळात स्थानिकांच्या मदतीने परप्रांतीय वनतस्करांनी दीडशे ते दोनशे सागवान वृक्षांची कत्तल केली.वनतस्करांनी ही अवैध वृक्षतोड करण्यापूर्वी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने खंडुखेडा राखीव जंगलाची रेकी केली. त्या ठिकाणी सागवान उपलब्ध असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी जंगलात राहुटी लावून रात्रीच्या मुक्कामाला नियोजनबद्ध वृक्षतोड घडवून आणली. वृक्षतोडीनंतर त्या लाकडावर उपचार करून त्याची त्यांनी चरपटे तयार करवून घेतली.दरम्यान, खंडुखेडा राखीव जंगलात तयार माल (लाकूड) घेऊन जाण्याकरिता वाहन नेमके कुठे लावायचं आणि कुठून काढायचे, याची पाहणी करण्यासाठी एम.पी. ४८ सी ४६१५ क्रमांकाच्या कारने दाखल झालेले वनतस्कर वनकर्मचाऱ्यांच्या नजरेत भरली. राखीव जंगली भागात फिरणाºया कारवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. जंगलात ७२ तास घालवून वनकर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. सध्या हे आरोपी तुरुंगात आहेत. एक मोबाइल व कार वन्यजीव विभागाच्या ताब्यात आहे. राखीव जंगलात एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.सिपना वन्यजीव विभागाने याप्रकरणी मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील आठ आरोपींसह खंडुखेडा येथील स्थानिक रहिवाशाला अटक केली. एक जण फरार असून, आरोपींच्या मोबाइलचे सीडीआर मागविण्यात आला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सेमाडोह-जव्हारकुंड क्षेत्रात व हरिसाल वनपरिक्षेत्रातही मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड असल्याची माहिती आहे.दरम्यान, धाना बीटमधील वनखंड क्रमांक ३०३ मध्ये २३ सागवान वृक्षांची वनतस्करांनी अवैध कत्तल केली. वनतस्करांना रंगेहाथ पकडले. वनतस्करांनी प्रादेशिकमध्येही वृक्षतोड केल्याचे सिपना वन्यजीव विभाग (परतवाडा) येथील उपवनसंरक्षक शिवाबाला एस. यांनी दिली.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कोट्यवधीची वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:00 IST
वनतस्करांनी ही अवैध वृक्षतोड करण्यापूर्वी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने खंडुखेडा राखीव जंगलाची रेकी केली. त्या ठिकाणी सागवान उपलब्ध असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी जंगलात राहुटी लावून रात्रीच्या मुक्कामाला नियोजनबद्ध वृक्षतोड घडवून आणली. वृक्षतोडीनंतर त्या लाकडावर उपचार करून त्याची त्यांनी चरपटे तयार करवून घेतली.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कोट्यवधीची वृक्षतोड
ठळक मुद्देखंडुखेड्यात सागवान झाडे तोडली : मध्य प्रदेशातील वनतस्करांचा महाराष्ट्रात हैदोस