एकाच मार्गावर दोनदा खर्च : बांधकाम विभागाचा विचित्र कारभार, प्रमुख मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्यमनीष कहाते अमरावतीसार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग बडनेरा अंतर्गत येणाऱ्या विविध रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी वर्षभरात कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला आहे. परंतु या रस्त्यांवर पुन्हा ठिकठिकाणी खड्डे पडल्याने आता पुन्हा लाखो रुपये खर्च करून या रस्त्यांवर डांबरांचे पॅचेस लावण्याचे काम सुरू आहे. दोनदा खर्च करूनही रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. या रस्त्यांवर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा-तिहारा फाटा-पिंपळगाव निपाणी प्रमुख जिल्हा मार्ग क्र. १२ व १३ या चार किलोमीटरच्या रस्त्याकरिता आॅगस्ट २०१५ पर्यंत ८७ लाख रुपये देखभाल आणि दुरुस्तीकरिता खर्च करण्यात आला आहे. मात्र, रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने सहा महिन्यांतच हा रस्ता उखडला आहे. विशेष म्हणजे आॅगस्ट २०१५ मध्ये प्रत्येकी ४१ आणि ४६ लाख १९ हजार असा ८७ लाख १९ हजार रुपये खर्च या रस्त्यावर झाला आहे. धानोरा गुरव ते तिहारा फाटा या १६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याकरिता ४० लाख ९३ हजार, लोणी-वाटपूर-साखरा-धनज रस्ता या प्रमुख जिल्हा मार्गावर ४४ लाख २४ हजार रुपये खर्च झाला आहे. लोणी-वाटपूर-साखरा-धनज पुन्हा ४ लाख ४० हजार रुपये, पिंपळगाव निपाणी-पळसमंडळ रस्त्यावर ५० लाख ९१ हजार रूपये खर्च करून बांधकाम करण्यात आले. आता याच रस्त्यावर वर्षभरात पुन्हा १८ लाख ८६ हजार रूपये खर्च दाखविण्यात आला आहे. धानोरा फशी, पापळ, पळसमंडळ, मंगरुळ चव्हाळा या प्रमुख जिल्हा मार्ग क्र.०५ वर एकाच वर्षात अनुक्रमे ३९ लाख ७९ हजार, २६ लाख ६७ हजार, ३९ लाख ७९ हजार, १५ लाख ५८ हजार असे एकूण १ कोटी ८० लाख ०९ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. शेलुगुंड, धानोरा फशी प्रमुख जिल्हा मार्गाच्या देखभाल-दुरूस्तीसाठी ८६ लाख १९ हजार रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. परंतु तरीही रस्त्याची दुरवस्था कायमच आहे. बडनेरा, यवतमाळ राज्य मार्गावर एकाच वर्षात ८९ लाख रुपये खर्च झाला. आॅगस्ट २०१५ पर्यंत बडनेरा बांधकाम उपविभाग अंतर्गत ३६ रस्ते येतात. प्रत्येक रस्त्यासाठी सुमारे ५० लाखांपेक्षा अधिक देखभाल दुरुस्ती खर्च करण्यात आला आहे. मात्र, रस्त्याची स्थिती अजुनही सुधारलेली नाही. रस्त्यावर वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कोट्यवधींचे रस्ते वर्षभरात उखडले
By admin | Updated: March 17, 2016 00:23 IST