अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत बुद्ध पौर्णिमेला शनिवारी व रविवारी सलग २४ तासांत करण्यात आलेल्या वन्यप्राणी प्रगणनेत १४ वाघांसह २९ बिबट्यांचे निसर्गप्रेमींना दर्शन घडले. वाघ, बिबट्या व्यतिरिक्त अन्य वन्यप्राणीदेखील शेकडोंच्या संख्येने असल्याची नोंद प्रगणेदरम्यान करण्यात आली आहे.दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला व्याघ्र प्रकल्पांत वन्यप्राणी गणना केली जाते. यावर्षी प्रगणनेसाठी आॅनलाईन बुकिंग करण्यात आले होेते. ६३९ निसर्गप्रेमींनी वन्यप्राणीदर्शन वजा प्रगणनेसाठी नोंदी केल्या होत्या. त्यापैकी ३८३ निसर्गप्रेमींनी ४३६ पाणवठ्यांवर प्रगणेत सहभाग घेतला. मेळघाटात वाघांची संख्या ५० पेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे; तथापि एकाच दिवशी पाणवठ्यांवर १४ वाघ आल्याच्या नोंदी करण्यात आल्याने ही बाब वनविभागासाठी आनंददायी मानली जात आहे. गुगामल व सिपनामध्ये प्रत्येकी चार तर अकोट वन्यजीव विभागात सहा वाघांनी निसर्गप्रेमींना दर्शन दिल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच गुगामलमध्ये तीन बिबट, सिपनामध्ये ११ तर अकोटमध्ये १४ बिबट आढळले आहेत. २१ मे रोजी दुपारी ४ वाजता वन्यप्राणी प्रगणेला सुरूवात झाली तर २२ मे रोजी दुपारी ४ वाजता ही प्रगणना संपली. २४ तासात पाणवठ्यावर आढळलेल्या वन्यप्राण्यांची नोंदी निसर्गप्रेमींनी केल्या आहेत. वन्यप्राणी प्रगणना करताना निसर्गप्रेमींसाठी ईश्वरचिठ्ठीद्वारे पाणवठ्यांची निवड करण्यात आली. त्यामुळे निसर्गप्रेमींना आवडीच्या स्थळी वन्यप्राणी प्रगणेत सहभागी होता आले नाही. मचानीवर बसून निसर्गप्रेमींनी प्रगणेत सहभागी होऊन २४ तास निसर्गाच्या सानिध्यात घालविलेत. गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक रवींद्र वानखडे, सिपना वन्यजीव विभागाचे सुनील शर्मा तर अकोटचे उमेश वर्मा यांनी वन्यप्राणी प्रगणेत मोलाची कामगिरी बजावली आहे.वडाळी वनपरिक्षेत्रात सहा बिबटवडाळी वनपरिक्षेत्रातील पोहरा, वडाळी, भातकुली व बडनेरा जंगलात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पाणवठ्यावर घेण्यात आलेल्या प्रगणेत सहा बिबट आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात चिरोडी, माळेगाव पाणवठ्यावर दोन बिबट आढळले आहेत. चितळ, रानमांजर, भेडकी, मोर, रोही, रानडुक्कर, हरिण या वन्यप्राण्यांच्या नोंदीदेखील झाल्या आहेत.वन्यप्राणी प्रगणेनंतर हाती आलेली आकडेवारी समाधानकारक आहे. एकाच दिवशी १४ वाघ, २८ बिबट आढळून आलेत. त्यामुळे मेळघाटात वन्यप्राण्यांची संख्या वाढीस लागल्याचे स्पष्ट होत आहे. - दिनेशकुमार त्यागी,क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प
मेळघाटात निसर्गप्रेमींना १४ वाघांसह २८ बिबट्यांचे दर्शन
By admin | Updated: May 24, 2016 00:30 IST