कंत्राटींची सेवा सुरुच : पात्र अधिकाऱ्यांवर अन्याय अमरावती: सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा कंत्राटी पद्धतीने घेण्याच्या शासननिर्णयाचा आधार घेत आतापर्यंत महापालिकेतील १८ अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले.मात्र बांधकामसह अन्य विभागातील बडे कंत्राटी अधिकारी जैसे थे असल्याने त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त असा प्रश्न उपस्थित झाला आहे.कंत्राटी अतिरिक्त शहर अभियंत्यासह, उपअभियंता आणि शिक्षणाधिकाऱ्यानांही ८ जानेवारीचा तोच शासननिर्णय लागू असल्याचे मत आयुक्त हेमंत पवार यांनी व्यक्त केले होते.मात्र १० दिवस उलटल्यानंतरही उर्वरित कंत्राटी अधिकाऱ्यांबाबत आयुक्त अद्यापपर्यंत निर्णय घेऊ शकले नाहीत. त्या अनुषंगाने आता महापालिकेत मेहरबानीची कुजबूज सुरू झाली आहे.तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मागील वर्षी २७ सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवा कंत्राटी तत्वावर घेतली होती. यात अतिरिक्त शहर अभियंत्यासह ,उपअभियंता, शिक्षणाधिकारी आणि अन्य काहींचा समावेश होता. आस्थापना खर्च अधिक असल्याने आणि नोकरभरतीवर बंदी असल्याने महापालिकेतील विकासकामे मार्गी लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.यापैकी बांधकाम विभागातील अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार आणि अतिरिक्त उपअभियंते एस.पी. देशमुख आणि नंदकिशोर राऊत यांना मुदतवाढही देण्यात आली.दरम्यान सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय धडकला. यात सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा केवळ विवक्षित कामांसाठीच घेण्यात याव्यात ,यासह अन्य अटी -शर्तीचा समावेश होता. सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा कंत्राटी पध्दतीने घेताना पारिश्रमकांची मर्यादा ४० हजार ठरविण्यात आली. या शासननिर्णयानुसार प्रस्ताव तयार करण्याच्या सुचनाही तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिल्या. मात्र ती फाईल धूळखात पडली राहिली. दरम्यान गुडेवारांची बदली होऊन हेमंतकुमार पवार रुजू झाले. महापालिकेचे कामकाज हाताळताना कंत्राटी सेवानिवृत्तांची फाईल त्यांच्या हाती आली.व त्यांनी धडक निर्णय घेउन पहिल्या झटक्यात तब्बल १५ सेवानिवृत्तांना कार्यमुक्त केले. त्यामुळे साहजिकच उर्वरित कंत्राटी सेवानिवृत्तांबाबतही त्याच शासननिर्णयाच्या अधीन राहून आदेश पारित होतील, अशी धास्ती अनेकांना लागून राहिली होती. मात्र अनामिक वरदहस्ताने संबंधितांची ती धास्ती दूर झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. (प्रतिनिधी)
मनपा प्रशासन 'बांधकाम'वर मेहेरबान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 00:07 IST