अमरावती : महापालिकेतील रिक्त झालेल्या स्थायी समिती सभापती पदावर काँग्रेसच्या कोट्यातून आसिफ तवक्कल यांची वर्णी लागावी यासाठी मुस्लिम नगरसेवकांनी मोर्चेबांधणी केली आहे. शनिवारी उपमहापौर शेख जफर यांच्या नेतृत्वात अन्य नगरसेवक व कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची जळगाव येथे भेट घेतली.जळगावस्थित हॉटेलमध्ये मुस्लीम नगरसेवकांच्या या प्रतिनिधी मंडळाने स्थायी समिती सभापतिपदावरून सुरू असलेला वाद चव्हाण यांच्या कानावर घातला. महापालिकेची आगामी निवडणूक पाहता उर्वरित कालावधीसाठी मुस्लीम नगरसेवकाला स्टँडिंग चेअरमन म्हणून संधी द्यावी, अशी आग्रही मागणी जफर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या भेटीला काँग्रेसचे स्थनिक नगरसेवक अब्दुल रफीक यांनी दुजोरा दिला. माजी आ. रावसाहेब शेखावत हेसुध्दा तवक्कल यांच्यासाठी आग्रही आहेत. मात्र चार वर्षांपूर्वी झालेल्या करारनाम्यानुसार शेवटचे सहा महिने स्थायी समितीचे सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटकडे आहे. त्यामुळे तवक्कल यांच्या उमेदवारीला खोडके गटाने जोरदार विरोध दर्शविला आहे. (प्रतिनिधी)
मुस्लीम नगरसेवक चव्हाणांच्या भेटीला
By admin | Updated: March 5, 2016 23:59 IST