पुढाकार : मंत्री, महापौर, आमदारांची उपस्थितीअमरावती: महानगरासाठी अतिशय महत्त्वाची असलेल्या नगरोत्थान अंतर्गत ४८ कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेसंदर्भात मंगळवारी २४ मार्च रोजी दुपारी ४ वाजता मुंबई येथे मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने होऊ घातलेल्या या बैठकीला राज्याचे पाणी पुरवठा, स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे प्रामुख्याने उपस्थित राहतील.मागील काही वर्षांपासून नगरोत्थान अंतर्गत मंजूर ४४.४४ कोटीची वाढीव पाणीपुरवठा वेळेत सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे आता ही योजना ४८ कोटींवर पोहचली आहे. ही योजना त्वरेने मंजूर होऊन शासनाने अनुदान देण्यात यावे, यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने ही बैठक होऊ घातली आहे. या बैठकीला पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर चरणजितकौर नंदा, आ. सुनील देशमुख, आ. रवी राणा, महापालिका आयुक्त अरुण डोंगरे, शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम, जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीचा विषय हाताळला जाणार आहे. तसेच महापालिकेला दलितवस्ती सुधार योजनेचे प्राप्त वैयक्तिक नळ योजनेतील अनुदान जीवन प्राधिकरणाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला जाईल. महापालिकेवर पाणी पुरवठ्याचे थकीत ३८ कोटी रुपये अनुदान स्वरुपात मंजूर करावे, ही मागणी देखील शासनाकडे रेटून धरली जाणार आहे. वाढीव पाणी पुरवठा योजनेचे ४८ कोटी रुपये मंजूर करण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी जोमाने भिडले आहे. या योजनेत सिंभोरा येथे नवीन पंप बसिवणे, तपोवन येथे नवीन शुद्धीकरण केंद्र, पाच जलकुंभ, नवीन वस्त्यांमध्ये जलवाहिन्या टाकण्याचे प्रस्तावित आहे. (प्रतिनिधी)
४८ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेवर मंत्रालयात बैठक
By admin | Updated: March 24, 2015 00:02 IST