अमरावती : चांदूरबाजार व अचलपूर तालुक्यात संत्रा, सोयाबीन, कपाशी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, याकरिता शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार यांना सोयाबीन कुटार व संत्री भेट देऊन तीव्र भावना शासनापर्यंत पोहचविण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे.अचलपूर मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांमध्ये सोयाबीन, कपाशी, संत्रा पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. परंतु यंदा अपुरा पाऊस तसेच गारपीट व अवकाळी पाऊसामुळे वरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर मोठा आघात झाल्यामुळे या परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावण्यासाठी राज्य शासनाने तातडीने हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, अशी मागणी प्रहार पक्षातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार यांच्याकडे केली आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे नापिकीमुळे झालेले नुकसान दाखविण्यासाठी प्रहार कार्यकर्त्यांनी यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांना सोयाबीनचे कुटार व संत्र्याचे झालेले नुकसान दाखवून आपला संताप शासनापर्यंत पोहविण्याची मागणी केली आहे. यावेळी प्रहारचे मंगेश देशमुख, राजेश वाटाणे, सुरेश गणेशकर, बाळासाहेब वाकोडे, राजेश सोलव, भाष्कर सांयदे शिवा भुयार, अजय तायडे, गजानन ठाकरे, एकनाथ अवसरमोल, संतोष किटुकले, भगवंत दामेधर, संजय झिंगरे, अजय राऊत, सुरेश भेंडे, सतीश राऊत, अरूण गणथडे, याशिम कुरेशी, नामदेव सावरकर व अन्य आर्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
उपजिल्हाधिकाऱ्यांना संत्री, सोयाबीन कुटार भेट
By admin | Updated: November 1, 2014 22:45 IST