मंगरूळ चव्हाळा येथील घटना : ३०० रुपयांची मागितली लाच नांदगाव खंडेश्वर : तीन महिन्यांच्या वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी ३०० रुपयांची लाच घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह आरोग्य सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी मंगरूळ चव्हाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अटक केली. विजय रामराव तायडे (५२, रा. सर्वोदय कॉलनी, कँग्रेसनगर रोड) व सतीश शांताराम बाबरे (५०, रा. सुंदरलाल चौक) अशी आरोपींची नावे आहेत. मंगरुळ चव्हाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याचे तीन महिन्यांचे वेतन थकीत होते. त्या वेतनाचे बिल काढून दिल्यावर आरोपींनी त्या कर्मचाऱ्याला ३०० रुपयांची लाच मागितली. याबाबत त्या कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याअनुषंगाने पोलीस उप-अधीक्षक राजेश गवळी, पोलीस निरीक्षक राहुल शिरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलाश सानप, पोलीस शिपाई श्रीकृष्ण तालन, अक्षय हरणे, अभय वाघ, धीरज बिरोले, चालक जाकीर खान यांनी आरोपीला पकडण्याची तयारी केली होती. शनिवारी सकाळी एसीबीच्या पथकाने सापळा रचून लाच घेताना रंगेहात अटक केली. लाच मागितल्यास संपर्क करा लाच मागितल्यास एसीबी कार्यालयात दूरध्वनी क्रमांक ०७२१-२५५२३५५ तसेच टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उप-अधीक्षकांनी केले आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच घेताना अटक
By admin | Updated: August 1, 2015 01:33 IST