अमरावती : दरवर्षी मे महिन्यामध्ये जाणवणाऱ्या उन्हाच्या जोरदार झळा यंदा एप्रिलच्या प्रारंभीच जाणवायला लागल्या आहेत. उन्हाच्या काहिलीनेमुळे नागरिकांचा जीव खाली-वर होऊ लागला असून, कूलर, पंखे काम करेनासे झाले आहेत. उन्हाच्या काहिलीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या काम करण्याच्या वेळांमध्ये मागील तीन ते चार दिवसांत बदल झाला आहे.
जिल्ह्यात तापमान ४२ अंशाच्या वर गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारी रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिलमध्येच असे असेल, तर मेमध्ये कसे, असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.. सकाळी ९ पासूनच उन्हाच्या झळा बसणे सुरू झाले आहे. दुपारी उन्हाची तीव्रता अधिक वाढत असल्याने वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला यांना त्रास होऊ लागला आहे. वाढत्या पाऱ्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. ग्रामीण भागातदेखील शेतीच्या कामाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. भल्या सकाळी शेतकरी व शेतमजूर कामासाठी शेताच्या वाटेवर दिसून येत आहेत. दुपारी विश्रांती घेत सकाळी व सायंकाळी शेतीची कामे उरकण्यावर शेतकरी व शेतमजुरांचा भर आहे. तापमानाचा पारा किती चढणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक धडपडत आहेत. वाढत्या तापमानामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
बॉक्स
कामाच्या वेळेत बदल
मार्चअखेर वाढलेल्या तापमानामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली. आगामी दिवसात सूर्य आणखी आग ओकणार असल्याच्या चिंतेने नागरिक हैराण झाले आहेत. शेतीची कामे सकाळी व सायंकाळच्या टप्प्यात करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे.
बॉक्स
कूलर, पंख्याची हवाही गरम
उन्हाचा तडाखा वाढतच असल्याने पंखे किंवा कूलर काम करेनासे झाले आहेत. गरमीपासून दिलासा मिळावा म्हणून नागरिक तापमानाचा पारा खाली जाण्याची वाट पाहत आहेत.