नाशिक : ‘ईद-उल-अज्हा’ अर्थात बकरी ईद शहरात सर्वत्र उत्साहात व शांततेत पार पडली. यानिमित्त शहरातील ईदगाह मैदानावर पारंपरिक पद्धतीने विशेष सामूहिक नमाजपठण करण्यात आले. यावेळी हजारो मुस्लीम बांधवांचा जनसागर ईदगाहवर उसळला होता.इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत इब्राहिम व त्यांचे पुत्र हजरत ईस्माइल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बकरी ईदचा सण साजरा करण्यात येतो. ईदच्या नमाजपठणाला विशेष महत्त्व असल्याने मोठ्या संख्येने नागरिक ईदगाह मैदानावर नमाजपठणासाठी हजेरी लावतात. शुक्रवारी (दि. २५) त्र्यंबकरस्त्यावरील ईदगाह मैदानावर खतीब-ए-शहर हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वामध्ये नमाजपठण सकाळी साडेदहा वाजता पार पडले. प्रारंभी मौलाना मुफ्ती महेबूब आलम यांनी प्रवचनातून ‘बकरी ईद’वर प्रकाश टाकला. प्रवचनानंतर खतीब यांनी सर्व उपस्थित जनसमुदायाला संबोधित करत विशेष नमाजपठणाची पध्दत स्पष्ट करून सांगितली.ईदगाह समितीचे हाजी सय्यद मीर मुख्तार यांनी ध्वनिक्षेपकावरून ‘नारे तकबीर, अल्लाहू अकबर,’ ‘नारे रिसालत या रसुलअल्लाह’चा जयघोष केला अन् नमाजपठणाला प्रारंभ झाला. ईदगाह मैदानावर जमलेल्या हजारो मुस्लीमांनी खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली ईदची विशेष नमाज सामूहिकरीत्या अदा केली. धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असलेल्या ‘खुतबा’ खतिबांनी वाचला. तसेच सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी दुवा मागितली. यावेळी उपस्थितांनी ‘आमीन’ म्हणत त्यांच्या प्रार्थनेला साथ दिली. दरुदोसलामच्या सामूहिक पठणाने अकरा वाजता नमाजपठणाच्या सोहळ्याची उत्साहात सांगता झाली. सूत्रसंचालन मीर मुख्तार यांनी केले. उपस्थितांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन, माजी राज्यमंत्री शोभा बच्छाव, दिनेश बच्छाव यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
सामूहिक नमाजपठणासाठी उसळला जनसागर
By admin | Updated: September 26, 2015 00:16 IST