२६ मार्चचा पारा ४३ पार : दरवर्षी तापमानाचा चढता आलेख राहणार वैभव बाबरेकर अमरावतीसात वर्षांतील तापमानाच्या तुलनेत यंदाचा मार्च सर्वाधिक 'हॉट' असल्याचे आढळून येत आहे. जल विज्ञान प्रकल्प विभागाने रविवारी दिवसाच्या तापमानाची ४३.२ डिग्री सेल्सिअस अशी नोंद घेतली. हवामान तज्ज्ञांच्या मते दरवर्षी सूर्याचा प्रकोप वाढणार असून तापमानाचा चढता आलेख मानव जीवनासाठी घातक ठरणार असल्याचे संकेत आहे. दरवर्षी ऋतुमानात मोठे बदल होत असताना नागरिकांनी पर्यावरणाविषयक आता जागृत राहणे निदांत गरजेचे आहे. वृक्षतोड व वाढते प्रदूषणाचा दुष्पपरिणाम पर्यावरणावर होत असल्यामुळे दिवसेंदिवस पृथ्वीवरील तापमान वाढत असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता, हिवाळ्यातील थंडी, तर पावसाळ्यात अतिवृष्टी जीवनसृष्टीवर प्रभाव टाकत आहे. जिल्ह्यातील सात वर्षांच्या तापमानाच्या आकडेवाडीवर नजर टाकली असता यंदा मार्चचा शेवटचा आठवडा सर्वाधिक उष्ण राहिल्याचे निदर्शनास आले. या सात वर्षातील मार्च महिन्यात ३८ ते ४२ डिग्रीची नोंद केली आहे. मात्र, यंदा मार्च महिन्यातील २६ तारखेला ४३.२ अंशाची नोंद जल विज्ञान प्रकल्प विभागाने घेतली आहे. ही नोंद सात वर्षात सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता वाढते, याच महिन्यात ४७ डिग्रीपर्यंत तापमानाची नोंद झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र झळांचा नागरिकांना सोसाव्या लागणार आहे. यंदा मार्चअखेर सूर्य आग ओकत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता नागरिक थंड हवेचे स्त्रोत शोध आहेत. मानवी जीवाप्रमाणेच वन्यजीवांवरही उन्हाचा मोठा परिणाम झाला असून जीव लाही लाही होत असल्याचे दिसून येत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी रुमाल, दुप्पटे, टोप्या व छत्रीची मदत घेतल्या जात आहे. मात्र, तरीसुध्दा उन्हामुळे निर्माण होणाऱ्या उकाड्याने अक्षरशा नागरिक हताश झाले आहेत. दुपारनंतर घराबाहेर जाणे टाळले जात असून अत्यंत आवश्यक काम असेल तरच नागरिक घराबाहेर निघत असल्याचे आढळून येत आहे.कक्ष स्थापनतापमान दरवर्षी वाढत असल्याने मानवी जीवनावर परिणाम होत आहे. उष्माघाताच्या रुग्णांत वाढ झाल्याचे दिसत आहे.शरीरातील पाणी कमी होऊन उष्माघाताची दाट शक्यता असते. त्यासाठी इर्विन रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. वृक्षतोड व वाढते प्रदूषण तापमान वाढविण्यास कारणीभूत आहेत. त्याचा मानवी जीवनावर घातक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अधिकाअधिक वृक्ष लावून पर्यावरण वाचवा. प्रदूषण थांबविणे गरजेचे आहे. - अनिल बंड, हवामानतज्ज्ञ
सात वर्षांत यंदाचा मार्च सर्वाधिक 'हॉट'
By admin | Updated: March 28, 2017 00:08 IST