बाजारपेठेत कैऱ्या विक्रीला : लग्नप्रसंगातील लुंजी हरविली
सुमीत हरकुट
चांदूर बाजार : आठवड्यापूर्वी अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यात कहर केला. काही आम्रवृक्षांना चांगले आंबे लागले होते, पाऊस व गारपिटीचा तडाक्यात आंबे गळून पडले. हे आंबे काही शेतकऱ्यांनी बाजारपेठेत विक्रीला आणले. मिळेल ते भाव घेऊन आंब्याच्या कैऱ्या विक्री केल्या. आंबा म्हटला की, अनेकांच्या जिभेला पाणी सुटत असते. त्यामुळे आंब्याच्या आमटीची व चटणीची चवच न्यारी आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
आंबा हा फळांचा राजा आहे. आंब्याच्या अनेक जाती आहेत. त्यामध्ये हापूस, नीलम या प्रजातीचा आंबा प्रसिद्धीच्या झोतात आहे. तरीही गावरान आंब्याची चवच काही न्यारी आहे. आंब्यापासून अनेक खाद्यपदार्थ घरोघरी बनविले जातात, शिवाय आता लग्नसराईत आंब्याचा रस, आमरस, पन्हे हे शेवया सोबत नवरदेव नवरीला भरवण्याची पद्धत भारतीय संस्कृतीत रूढ असल्यामुळे आंब्याचे महत्त्व वाढले आहे.
विवाह झाल्यानंतर ग्रामीण भागात आताही आंबेखानी पद्धत रूढ आहे तसेच गुढीपाडवा व कळस पूजन करतेवेळी आंब्याच्या पदार्थांना मोठे महत्त्व आहे. आम्रवृक्षाचे आयुष्य ३०० ते ४०० वर्षे असते. यामुळे आजोबा, पणजोबाने लावलेल्या झाडाचे आंबे नातू, पणतू खातात, असा समज रूढ आहे. यामुळेच पूर्वीच्या काळात आंब्याचे झाड लावणे म्हणजे पुण्यकर्म समजले जाई. आता जिकडे-तिकडे विदेशी आंब्याचे प्रचलन झाले आहे. गावरान आमराई दिसेनाशी झाली आहे. तरीही आजही तीनशे वर्षांपूर्वीची काही आंब्याची झाडे फळे देत आहेत. पशू,पक्षी, वानर, मानव आंब्याचे फळ खाऊन तृप्त होत असतात.
कच्चा आंब्यापासून आमरस, पिकलेल्या आंब्यापासून रस व विविध प्रकारचे व्यंजन तयार करण्यात येतात. आता बाजारपेठेत कैऱ्या विक्रीस दाखल झाल्या आहेत. मात्र, या कैऱ्यांच्या गुणांमुळे उन्हाळ्यात सरबत, पन्हे बनवण्यासाठी व रोजच्या जेवणात खाण्यासाठी उपयोग होत असतो. यामुळे कैऱ्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी होऊ लागली आहे.
---------------