तुलनात्मकरीत्या बालमृत्यूत घट : प्रभावी उपाययोजनेची आवश्यकता
संदीप मानकर अमरावती
शासनाची आरोग्य सेवा पाहिजे तशी अद्यापही मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी भागात न पोहचल्यामुळे बालमृत्यू होतच आहेत. इतर वर्षांच्या तुलनेत बालमृत्यू दरात जरी घट झाली असली तरी मेळघाटात १८ वर्षांत ९ हजार ६३० बालमृत्यू झाल्याचे आकडेवारीतून उघड झाले आहे. मेळघाटात अनेक वर्षे समाजसेवा करीत असलेले खोज या संस्थेचे संस्थापक बंड्या साने यांनी गाभा समितीच्या अहवालावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी प्राप्त झाली आहे. मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील अतिदुर्गम भागात अद्यापही आरोग्य सेवा पोहोचलीच नाही. शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत बालमृत्यू रोखण्यासाठी युद्धस्तरावर नेहमीच प्रयत्न करण्यात येतात. ० ते ६ वर्षे वयोगटातील हे मृत्यू आहेत. मातेला व बाळाला सकस आहार न मिळणे, कमी वजनांचे बाळ जन्माला येणे, अल्पवयीन माता, तसेच त्याला वेळेवर योग्य उपचार न मिळणे किंवा अज्ञानतेमुळे लहान मुलांना अतिरिक्त क्षमतेचा डोस दिल्याने बालमृत्यू झाल्याची अनेक कारणे समोर आली आहेत. बालमृत्यू थांबविण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महिला व बालविकास यंत्रणा व जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे नियंत्रण असते. सन १९९६-९७ मध्ये सर्वाधिक १,०५० बालमृत्यू झाले होते. २०१२-१३ मध्ये ४०९ बालमृत्यू होते. यामध्ये घट झाली. पण २०१३-१४ मध्ये वाढ होऊन हा आकडा ४२६ वर पोहोचला, तर २०१५ या वर्षातील आकडेवारी प्राप्त होऊ शकली नाही.