अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात संक्रमितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बाहेर राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसह, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांतील चालक-वाहकांची तपासणी नाक्यावर पोस्टवर कोरोना चाचणी अवश्य करण्यात यावी. ग्रामसमित्यांद्वारे गावागावांत चाचण्यांचा वेग वाढवावा. संक्रमणाचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ कमी करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी सोमवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपायायोजना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यात विभागीय आयुक्त पीयूष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) हरिबालाजी एन., मनपा आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह आरोग्य क्षेत्रातील अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
ग्रामीण भागात कोरोना संक्रमितांचा आकडा गेल्या दोन महिन्यांपासून वाढत आहे. संक्रमितांची संख्या कमी करण्यासाठी आरोग्य विभागासह महसूल व पोलीस प्रशासनाने ‘मिशन मोड’वर प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. जिल्ह्यात काही गावे अल्प कोरोनाबाधित तर काही गावे संपूर्णपणे कोरोनाबाधित आढळून आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने सर्व शासकीय यंत्रणांनी जाणीवपूर्वक काम करणे आवश्यक असून, वेळीच प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे विभागीय आयुक्त म्हणाले.
बॉक्स
सीमा भागावर तपासणी वाढवा
धारणी, परतवाडा तसेच वरूड सीमा भागातून मध्य प्रदेशमधून येणाऱ्या प्रवाशांची तसेच मालवाहतूक, ॲम्ब्युलन्स आदी वाहनांची सीमा भागावरील चेक पोस्टवर कडक तपासणी करावी. आरटी-पीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची तपासणी करूनच संबंधितांना जिल्ह्यात प्रवेश द्यावा. ग्रामीण भागात आरटी-पीसीआरसह रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट बंधनकारक करावी. विनाकारण फिरणाऱ्यांवर समित्यांद्वारे कारवाई करण्याचे निर्देश सिंह यांनी दिले.