सई ताम्हणकर : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे शानदार उद्घाटनगुरूकुंज मोझरी : तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रो- कबड्डीचा स्टार खेळाडू शुक्रवारी गुरुकुंजात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाला आले होते. यावेळी ‘सई’ला पाहण्यासाठी तरुणांनी एकच गर्दी केली होती. यावेळी मंचावरून तरुणाईला संबोधन करण्याकरिता ‘सई’ला आमंत्रित केले असता, तिने युवकांनो सेल्फी सोडा मोबाईलचे कॅमेरे बंद करा आणि सौंदर्याला उघड्या डोळ्यांनी लुटा, आनंद घ्या आणि मंत्रमुग्ध व्हा, असा सल्ला दिला. सोबतच गुरुकुंजाला निसर्गाचे अप्रतिम लेण लाभलेले आहे, त्याचं संगोपन करा. या ठिकाणी ‘अध्यात्म आणि विज्ञानाचा’ अप्रतिम संगम ठेवा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांच्या स्वच्छता अभियानाला हातभार लावून यशस्वी करा, असा मोलाचा सल्ला सई ताम्हणकरने दिला. युवकांनो आपले मुलं खूप मोठे व्हावे, असे स्वप्न प्रत्येक आई-वडिलांचे असते. ती पूर्ण करा. मी खूप मोठा खेळाडू व्हावा, असे माझ्याही आईवडिलांना वाटत होते. ते स्वप्न मी पूर्ण केले, अशी भावना प्रो स्टार कबड्डी खेळाडू काशिलिंग अडके यांनी व्यक्त केली. यावेळी मंचावर आ. यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी किरण गित्ते सपत्नीक उपस्थित होते. युवक-युवतींची लक्षवेधी उपस्थिती होती.
स्वच्छता अभियान यशस्वी करा
By admin | Updated: January 22, 2017 00:11 IST