कर्मचाऱ्यांचे अपडाऊन : अधिकाऱ्यांचे होतेय दुर्लक्षरिध्दपूर : राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले असले तरी रिध्दपूर परिसरातील कर्मचारी, अधिकारी मुख्यालयी राहात नसल्याची ओरड वाढत आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. येथील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे शासनाने बंधनकारक केले आहे. परंतु ग्रामीण भागातील शिक्षक, डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, बँक कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, विद्युत कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी शासनाच्या आदेशाचे तीनतेरा वाजविले आहे. आदेशाला न जुमानता तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणावरून कर्मचारी ये-जा करतात. शासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता तसे भासवत आहेत. मुख्यालयी न राहता हे कर्मचारी घरभाड्याची उचल करतात. ही बनवाबनवी कर्मचारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांसमोर करीत आहेत. ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, केंद्र प्रमुख, विद्युत कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शिक्षकच मुख्यालयी राहात नसल्याने विद्यार्थ्यांवर वचक राहात नाही. पालक-शिक्षक संघ आणि इतर समित्या फक्त कागदावर असून याकडे कोणतेच प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी लक्ष देण्यास तयार नाहीत. लोकप्रतिनिधीचा वचक नसल्यामुळे हा प्रकार सुरू आहे. कर्मचारी जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहून त्यांच्या मुलांना खासगी शाळांमध्ये शिक्षण देतात. तेथून ते शासकीय कर्मचारी दुचाकीने ये-जा करतात. ग्रामीण भागात ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, विद्युत कर्मचारी मुक्कामी राहात नसल्यामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)
मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला ‘खो’
By admin | Updated: September 3, 2015 00:11 IST