बडनेरा : सलग ७ दिवसांपासून नवीवस्ती परिसरात पाण्याचा एक थेंबही न मिळल्यामुळे या परिसरातील महिलांनी जीवन प्राधिकरणच्या कार्यालयाला शनिवारी कुलूप ठोकून संताप व्यक्त केला. पाण्याचा पुरवठा तत्काळ सुरळीत न झाल्यास उपविभागीय अभियंता सोनार यांच्या कार्यालयात ठिय्या देण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला.
बडनेर्यात दोन टाक्यांमार्फत पाणीपुरवठा केला जातो. एक जुन्या वस्तीत तर दुसरी नव्या वस्तीत पाण्याची टाकी होती. जुन्यावस्तीतील पाण्याच्या टाकीचे डोम कोसळल्याने या टाकीतून जुन्या वस्तीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. ही टाकी भुईसपाट करण्याचे काम सुरु आहे. याच ठिकाणी नवीन टाकी उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे धूळखात आहे. मागील वर्षभरापासून बडनेर्यातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे बडनेरावासीयांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
१२ मे २0१४ पासून बडनेर्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. नव्या वस्तीच्या टाकीतून संपूर्ण बडेनरा शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठय़ाच्या वाढत्या मागणीमुळे जीवन प्राधीकरणाला एकाच टाकीतून पाण्याचा पुरवठा करणे शक्य होत नसल्यामुळे एक दिवस जुन्यावस्तीत तर एक दिवस नव्या वस्तीत पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तोदेखील अनियमित होत असल्यामुळे बर्याच भागामध्ये पाणी मिळत नाही. गेल्या सात दिवसांपासून हमालपुरा, गजानन नगर, झिरी परिसराला पाण्याचा पुरवठा बंद आहे. या ठिकाणच्या पाईप लाईनमध्ये अडथळा निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. याचाच संताप व्यक्त करीत स्थानिक हमालपुरा परिसरातील महिलांनी नव्या वस्तीस्थित पाण्याच्या टाकीजवळच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. एसटी डेपोच्या मागील बाजूस असणार्या शारदा नगरामध्ये गेल्या एक महिन्यांपासून पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नाही. त्याचप्रमाणे वडरपुर्यात तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा व्यवस्थित नाही.
चावडी चौक, ब्राम्हणपुरा, बारीपुरा, पवणनगर, मिलचाळ परिसर, नव्यावस्तीतील माळीपुरा या भागात कमी दाबाचा पाणीपुरवठा होतो. जीवन प्राधिकरणने याचे नियोजन करुन लवकरात लवकर पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी संतप्त महिलांनी जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता सोनार यांच्या समोर मांडली. पाणी समस्या तातडीने निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)