अमरावती : सद्यस्थितीत कोरोना संसर्ग वाढताच असल्याने त्याला अटकाव घालणे हीच प्राथमिक जबाबदारी आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. व्यापारी संघटनेच्या सूचनेवरून चाचणी शिबिरांचे आयोजन केले जाईल. व्यापाऱ्यांच्या ज्या मागण्या असतील, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी मंगळवारी व्यापारी संघटनेला दिली.
व्यापाऱ्यांनीही ‘नो मास्क - नो एंट्री’ मोहीमच राबविली पाहिजे. आपल्यामार्फत कोरोना नियंत्रणासाठी जनजागृती करण्याचे आवाहनही यावेळी आयुक्तांनी केले. चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंट्स अँड इंडस्ट्रीज अमरावतीचे अध्यक्ष सुरेश जैन, उपाध्यक्ष प्रकाश बोके, सचिव घनश्याम राठी, कोषाध्यक्ष जयंत कामदार, सुदीप जैन, अशोक मंत्री, महेश पिंजानी, पप्पू गगलानी, सारंग राऊत, विजय भुतडा, राजा चांदवाणी, अशोक राठी बैठकीत उपस्थित होते. प्रशासनाने मार्केट उघडण्यास परवानगी दिली, तरच दुकाने उघडण्यात येतील. मात्र, प्रशासनाने सकारात्मकरीत्या व्यापाऱ्यांना न्याय देण्याची मागणी अध्यक्ष सुरेश जैन यांनी आयुक्तांना केली. संघटनेच्या मागणीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची ग्वाही आयुक्तांनी दिली.