अमरावती : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत यापूर्वीच अमरावती महापालिका, अचलपूर व भातकुली नगरपालिका क्षेत्र व लगतचा काही परिसर कंटेनमेंट झोन घोषित करून तेथे संचारबंदी लागू करण्यात आली. यांसह अंजनगाव सुर्जी नगरपालिकेचे क्षेत्रही कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या सर्व क्षेत्रांत १ मार्चच्या सकाळी ६ पासून ८ मार्चच्या सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांंनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील काही काळ निर्बंध आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर पुढील स्थिती पाहून निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले. वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक सेवा यांना या निर्णयातून यापूर्वी दिलेली सवलत व त्यासाठी निश्चित केलेल्या वेळा कायम आहेत. त्यानुसार अमरावती, अचलपूर व अंजनगाव सुर्जी या शहरात सकाळी ८ ते ३ या वेळेत जीवनावश्यक सेवा, दुकाने सुरू राहतील. बिगर जीवनावश्यक दुकाने बंद राहतील. नोंदणीकृत व यापूर्वी परवानगीप्राप्त उद्योग सुरू राहतील. तिन्ही शहरांतील आठवडी बाजार बंद राहतील. उपाहारगृहे व हॉटेलला केवळ पार्सल सेवा पुरवता येईल. शासकीय कार्यालयांत १५ टक्के किंवा किमान १५ व्यक्ती उपस्थित असाव्यात. मालवाहतूक व वाहतुकीला निर्बंध नाहीत.
ठोक भाजी मंडई पहाटे दोन ते पहाटे सहा या वेळेत सुरू राहील व त्यात केवळ किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश असेल. तिन्ही शहरांतील शाळा, महाविद्यालये, शिकवण्या, क्लासेस बंद राहतील. शासकीय, निमशासकीय परीक्षांना परवानगी आहे. व्यायामशाळा, चित्रगृहे व बहुविध चित्रगृहे बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉक्स
उर्वरित जिल्ह्यात सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत मुभा
अमरावती लगतच्या बिझी लँड, सिटी लँड, ड्रिम लँड परिसर, तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी, अचलपूर तालुक्यातील कांडली, देवमाळी तसेच भातकुली तालुक्यातील भातकुली नगरपंचायत तसेच अंजनगाव सुर्जी शहरातलगतचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला. तिथेही संचारबंदीचे हे आदेश लागू आहेत. याशिवाय जिल्ह्यातील इतर क्षेत्रांमध्ये यापूर्वी लागू निर्बंध व सवलती कायम आहेत. त्यानुसार तिथे दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.