शिरजगाव कसबा : चांदूर बाजार तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या शिरजगावात जिल्हा परिषद व पंचायत समिती लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या भागात पशुधनाच्या मृत्यूची मालिका सुरूच आहे. गावातील प्रथमश्रेणी पशू दवाखान्यात अनेक वर्षांपासून पशुवैद्यकीय डॉक्टर नाही. डॉक्टरची नियुक्ती होत नसल्यामुळे गावातील आजारी जनावरांना योग्य वेळी उपचार व सल्ला न मिळाल्याने या भागातील पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाबद्दल प्रचंड नाराजी आहे.
काही दिवसांपूर्वीच गावातील अमोल दाभाडे या पशुपालक शेतकऱ्याची ७० हजार किमतीची म्हैस तिच्या वासरासह प्रसूतीदरम्यान दगावली, तर १ एप्रिलला पुन्हा पाळा शिवारामधील गोठ्यामध्ये सागर रतिलाल गुर्जर यांची चार महिने गर्भवती असणारी म्हैस उपचाराअभावी मरण पावली. हजारो रुपये किमतीच्या मुक्या जनावरांचे मृत्यू डोळ्यांसमोर होत असल्यामुळे प्रशासनाबद्दल रोष निर्माण होत आहे. गावातील पशुपालन करणाऱ्या नागरिकांना पशूंसाठी मूलभूत आरोग्य सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. गावातील जनावरांची संख्या पाहता तातडीने पशुवैद्यकाची नियुक्ती करण्यात यावी, ही मागणी गावातून पशुपालन करणारे नागरिक करीत आहेत.