दुरवस्थेबाबत संताप : व्यवस्था सुधारण्याची मागणीदर्यापूर : स्थानिक बस डेपोतील दुरवस्था सुधारण्याबाबत वारंवार मागणी करूनही आगार व्यवस्थापकांकडून दुर्लक्ष होत असल्याने संतप्त शिवसैनिकांनी शनिवारी दुपारी १ ते १.३० वाजताच्या दरम्यान आगाराच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून निषेध नोंदविला. तब्बल १ तास प्रवेशद्वार कुलूपबंद असल्याने काही काळ याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौैधरी, एसडीपीओ अमोल गायकवाड, ठाणेदार ए.के.पवार यांनी संतप्त शिवसैनिकांची आगार परिसरात भेट घेऊन समजूत काढल्यानंतर तणाव निवळला. परंतु या संपूर्ण प्रकारादरम्यान आगार व्यवस्थापकांसह इतर कर्मचारी अनुपस्थित असल्याने शिवसैनिकांनी तीव्र रोष व्यक्त केला. दर्यापूर बसस्थानकात प्रवाशांसाठी आवश्यक सोयी नाहीत. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यक शेडयूल नसल्याने विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत वारंवार मागण्या करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी यावेळी केला. आंदोलनामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब हिंगणीकर, बाबाराव बरवट, युवासेनेचे भैया बरवट, तालुका प्रमुख सुनील डिके, शहर प्रमुख नंदू गुल्हाने, उपशहर प्रमुख रवी गणोरकर, राहूल भुंबर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिवसैनिकांनी ठोकले दर्यापूर आगाराला कुलूप
By admin | Updated: August 16, 2014 23:13 IST