अमरावती : बदलत्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी स्त्री सक्षम व्हावी, या उदात्त विचारसरणीतून स्व. ज्योत्स्ना दर्डा यांनी सखी मंचची स्थापना केली. तेव्हापासून सखी मंचच्या माध्यमातून महिलांचे मनोबल उंचावणारे कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून स्थानिक मनोरमांगल्य सभागृहात महिलांसाठी ‘भाज्यांपासून लोणची’ बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेत करूणा नाशिककर यांनी सखींच्या हिरव्या भाज्यांच्या रेसिपीजची माहिती दिली. कोणतेही प्रिझरर्व्हेटिव्ह न वापरता भाज्यांमधील पौष्टिकता कशी टिकवून ठेवता येईल, याचे धडे सखींनी गिरविले. सखींनी या सर्व माहितीची टिपणे काढली. दररोजच्या प्रशासकीय कामकाजाच्या धावपळीतून थोडा वेळ काढून मिनी महापौर अर्चना इंगोले, नगरसेविका सुनीता भेले, संगीता वाघ, अर्चना राजगुरे यांनीदेखील या कार्यशाळेत हजेरी लावली. सखी मंचच्या रंजना वाघ यांनी सखी मंचविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला सखींची मोठी गर्दी उसळली होती. सखी मंचच्या संयोजिका स्वाती बडगुजर यांनी आगामी सदस्यता नोंदणीविषयी माहिती दिली. तसेच महिलांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा कार्यशाळांचे वेळोवेळी आयोजन करण्याचे आश्वासनदेखील दिले आहेत. कार्यशाळेसाठी अर्चना एरंडे, सरिता नांदूरकर, जयश्री पाबळे, भारती क्षीरसागर, नलिनी थोरात यांनी कार्यक्रमाकरिता यशस्वी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)
सखींनी घेतले भाज्यांपासून लोणची बनविण्याचे धडे
By admin | Updated: December 25, 2014 23:25 IST