नागरिक त्रस्त : आंदोलन करणारे नगरसेवक गेले तरी कुठे?
वरूड : नगर परिषदेत कर्मचारी, अधिकाऱ्यांची कार्यालयीन वेळ निश्चित आहे. सकाळी १० वाजता नगरपरिषदेचे कामकाज सुरू होते. परंतु, मंगळवारी १०.३० च्या सुमारास फेरफटका मारला असता, कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. आठ-दहा कर्मचारी आणि तेही बाहेर बसलेले होते. यामुळे कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना ताटकळत बसावे लागले.
वेळेचे भान न ठेवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत. जनतेच्या समस्येवर आंदोलन करणारे नगरसेवक आता काय भूमिका घेणार, अशी चर्चासुद्धा उपस्थित नागरिकांमध्ये सुरू होती. वरूड नगर परिषदेत प्रत्येक विभागात अधिकारी, कर्मचारी, शिपाई असा मोठा कर्मचारी वर्ग आहे. आरोग्य, बांधकाम, शिक्षण, पाणीपुरवठा, सामान्य प्रशासन असे विभाग आहे. कार्यालयीन वेळ १० वाजताची असून यांच्या हजेरी करीता बायोमेट्रिक मशीन आहे. परंतु, कोरोना काळात ती वापरात नसल्याने 'कधीही या अन् कधीही जा' अशी अवस्था आहे. नगर परिषदेतील नगराध्यक्षांविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणल्याने पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांचे वाद सुरू आहेत. याच बाबीचा फायदा घेऊन कर्मचारी, अधिकारी लेटलतीफ झाल्याचा प्रत्यय अनेकांना येत आहे. दरम्यान मला शासकीय बैठकीसाठी अमरावतीला यावे लागले. मला याबाबत माहिती नाही. परंतु कार्यालयीन वेळेनंतर येणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना जाब विचारून कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी रवींद्र पाटील म्हणाले.
--------