अमरावती : महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्य प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असली तरी अनेक महिन्यांपासून एसटीची सेवा येथे बंद केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. मात्र, आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मध्य प्रदेशसाठी बससेवा सुरू केल्यामुळे प्रवाशांची सोय झाली असून, एसटीच्या उत्पन्नातही वाढ होत आहे.
दीड वर्षापूर्वी कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांच्या वाहतुकीचे प्रमुख साधन असलेली एसटीची चाके थांबली होती. खासगी बसेससोबत स्पर्धा असणार एसटीची आर्थिक परिस्थिती आधीच फारशी चांगली नव्हती. त्यात कोरोनाचे विघ्न आले. प्रवासी वाहतूक बंद झाल्याने त्यातून मिळणारे उत्पन्न बंद झाले. त्या काळात एसटीने मालवाहतुकीवर भर दिला होता. अशातच कर्मचाऱ्यांचे पगार करणे महामंडळाला कठीण झाले होते. मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर प्रवाशांसाठी एसटी बसेस सुरू केल्यात. अमरावती येथून मध्यप्रदेशातील भ़ोपाळ, खंडवा बऱ्हाणपूर, मुलाताई, पांढुर्णा, छिंदवाडा, बैतुल, इंदौर यासोबतच आंध प्रदेशमधील हैदराबाद आदी ठिकाणी बसेस जात असतात. मात्र, कोरोनामुळे मध्यप्रदेशने मात्र महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहतुकीवर बंदी घातली होती. त्यामुळे एसटीच्या बसेस मध्य प्रदेशच्या सीमेवर जात होत्या. आता ३ सप्टेंबरला मध्य प्रदेश सरकारने आपल्या सीमा खुल्या केल्यामुळे महाराष्ट्रातील तसेच खासगी बसेस तेथे जाऊ लागल्या आहेत.
बॉक्स
अमरावतीतून दररोज १४ फेऱ्या
अमरावती येथून परिवहन महामंडळाच्या दररोज १४ फेऱ्या मध्य प्रदेशात होत आहेत. अमरावतीहून मध्य प्रदेशातील भोपाळ, खंडवा, बऱ्हाणपूर, इंदौर, पांढुर्णा, मुलताई, छिंदवाडा आदी ठिकाणी दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी नुकत्याच राज्य परिवहन महामंडळाने मध्य प्रदेशात जाणाऱ्या एसटी बसेसच्या १४ फेऱ्या सुरू केल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली.