अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची वाढती संख्या चिंताजनक आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजनचा तुटवडा कायम आहे. कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. कोरोना ॲक्टिव्ह रुग्णसंख्या बघता दररोज एक हजार रेमडेसिविरची गरज असताना केवळ २०० ते ३०० मिळत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना रेमडेसिविरसाठी वेटिंगवर राहावे लागत आहे.
शासकीय, खासगी कोविड रूग्णालयात कोरोना रूग्णांना लागणारे रेमडेसिविर ईंजेक्शन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे साेपविण्यात आली आहे. तिवसा, नांदगाव खंडेश्र्वर, अचलपूर, वरूड, मोर्शी, दर्यापूर, धारणी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पीडीएमसी यासह ३२ खासगी कोविड रुग्णालयांना रेमडेसिविरचा पुरवठा केला जातो. कोविड
रूग्णालयातील कोरोना रूग्णसंख्येच्या आधारे आणि डॉक्टरांच्या मागणीनुसार ते रूग्णांसाठी दिले जाते. मात्र, गत दान दिवसांपासून रेमेडेसिविरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या कोरोना रूग्णांना हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचे वास्तव आहे. औषधी होलसेल विक्रेत्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनसाठी कपंन्यांकडे मागणी नोंदविली असून, त्यानुसार ॲडव्हान्स रक्कमही पाठविली आहे. मात्र, आठवड्याभरापासून रेमडेसिविर उपलब्ध होऊ शकले नाही.
-------------------
अशी आहे रेमडेसिविरची किंमत
खासगी रुग्णालय : ३३०० रुपये
शासकीय रूग्णालय : ८९० रूपये
-------------------
गत दोन दिवसांपासून रेमडेसिविरचा तुटवडा आहे. बुधवारी आले नाही पण गुरुवारी उशिरा सायंकाळपर्यंत येतील, अशी माहिती आहे. शासकीय खासगी रुग्णालयात उपचारार्थ असलेल्या रूग्णांसाठी रेमडेसिविरची मागणी होत आहे.काळाबाजार होत
असल्याची चर्चा आहे. त्याअनुषंगाने चाचपणी केली जात आहे.
- मनीष गोतमारे, ड्रग्ज निरीक्षक, औषध प्रशासन, अमरावती
--------------------
कोट
रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा कायम आहे. पीडीएमसीमध्ये दररोज २५ ते ३० रेमडेसिविर लागतात. कमी पडल्यास सुपर स्पेशालिटीमधून मागविले जाते. अशी तात्पुरती व्यवस्था करण्यात येत आहे. कोरोना महामारी बघता आराेग्य प्रशासनाने रेमडेसिविर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
- अनिल देशमुख, अधिष्ठाता, पीडीएमसी. अमरावती