पथ्रोट : होळीसाठी गावी गेलेले अदिवासी बांधव फगवा मागण्यात गुंग आहेत. त्यातच लॉकडाऊन सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना गहू सोंगणीकरिता मजूर मिळेनासा झाला. परिणामी सोंगणीला आलेला गहू शेतातच पडला आहे. त्यातच हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. परिणामी, मजूर वर्ग जो दर मागत आहेत, त्या दराने शेतकरी गहू सोंगून घेण्यास तयार आहेत. तरीही मजूर येण्यास तयार नाहीत.
काही शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून मूर्तिजापूर भागातील ट्रॅक्टरवरील हार्वेस्टर वजा गहू काढणी यंत्र आणून २२०० प्रतिएकराप्रमाणे गहू काढून घेतला. मात्र, हार्वेस्टरमुळे शेतकऱ्यांच्या हाताला कुटार येत नाही. यामुळे त्यांना जनावरांच्या चाऱ्याकरिता कुटार विकत घेण्याचा भुर्दंड बसत आहे.
गावातील मजूर गहू सोंगणीला येत नसल्यामुळे मेळघाटातील आदिवासी मजुरांना त्यासाठी बोलावले जात होते. आता मोजकाच मजूर गहू सोंगणीला येत असून, त्यांना एका एकरासाठी ८ कुडव म्हणजे १२८ किलो गहू मोजून द्यावे लागतात. त्यातच गहू काढणाऱ्या थ्रेशर मालकाला तीन पोत्याला ३० किलो गहू द्यावे लागतात. नवीन गव्हाचे पीक विकण्याकरिता बाजारपेठेत नेले असता, व्यापाऱ्यांकडून गव्हाचे भाव पाडण्याची पद्धत जुनीच आहे.