धामणगाव रेल्वे: कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने धामणगाव तालुक्यासाठी कोविड रुग्णालय व्हावे, यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह प्रशासनाकडे गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. २२ एप्रिलला यासंदर्भात पत्र दिले. धामणगाव येथे कोविड रुग्णालय सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू असल्याचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी सांगितले.
कोविड-१९ च्या रुग्णसंख्येमध्ये प्रचंड वाढ होत आहे. ती आणखी वाढू शकते. प्रत्येक रुग्णाला आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी उपाययोजना म्हणून धामणगाव तालुक्यात कोविड रुग्णालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी पालकमंत्री यशोमती ठाकूर व प्रशासनाकडे केली आहे. धामणगाव येथे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तसेच शासकीय वसतिगृह असून, येथे सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. तालुक्यात कोविड रुग्णालय सुरू व्हावे, जेणेकरून धामणगाव तालुक्यातील रुग्णांना गैरसोय होणार नाही व अमरावती येथील रुग्णालयाचा भार कमी होईल तसेच परिसरातील रुग्णांनासुद्धा होईल, असा मुद्दा २२ एप्रिलला अमरावती येथे झालेल्या पालकमंत्री यांच्या सभेत मांडण्यात आला होता व यासंदर्भातील मागणीपत्र दिले आहे. जुना धामणगाव येथील समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहाची पाहणी प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. सदर कोविड रुग्णालय ५० खाटांचे असावे व या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात यावी. अशी आग्रही जगताप यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे केली आहे.