वनोजा बाग : कोतवालांच्या विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित असून, त्या मान्य न झाल्यास १६ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा कोतवाल संघटनेने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
महसूल प्रशासनाचा ग्रामीण भागात नागरिक व प्रशासन यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या कोतवालांच्या आजमितीला समस्या वाढलेल्या आहेत. शासन स्तरावर कोतवालांच्या मागन्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यात कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा देऊन समान काम, समान वेतन धोरणानुसार मासिक वेतन १५ हजार रुपये द्यावे, ६ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयाबाबत दिलेल्या मार्गदर्शनात शासन निर्णयाप्रमाणे पात्र असूनही कोतवालांना मानधन मिळत नाही. त्यामुळे ती मार्गदर्शन सूची रद्द करावी. कोतवालांना तलाठी व तत्सम पदांमध्ये ५० टक्के आरक्षण देणे शिपाई समूहातील सर्व जागा कोतवाल संवर्गातून भरण्यात यावे. कोरोनाने मृत पावलेल्या कोतवालांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर जागा नोकरी द्यावी. सेवानिवृत्त कोतवालांना १० लक्ष निर्वाह भत्ता द्यावा, अशा विविध मागण्यांचा समावेश निवेदनात आहे. त्या मान्य न झाल्यास येत्या १६ ऑगस्टपासून कोतवाल संघटना राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अंजनगाव तहसीलदारांमार्फत सादर निवेदनातून देण्यात आला. यावेळी अध्यक्ष संजय राक्षसकर, सचिव रजनी शर्मा, चंचल अस्वार, संदीप बुतें, आशिफ शाह, चेतन तायडे, गणेश सदार, संतोष वानखेडे, गजानन हरणे, संदीप अगडते, सारिका इंगळे, प्रगती वानखडे, प्रगती पवार आदी कोतवाल उपस्थित होते.
--------------------------