निवेदन : दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कोकर्डा येथील देशी दारूचे दुकान कायम स्वरूपी बंद करण्यात यावे, अशी मागणी बुधवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाव्दारे महिलांनी केली आहे.कोकर्डा गावच्या झेंडा चौकातील देशी दारू विक्रीचे दुकान बंद करावे, यासाठी काही दिवसांपूर्वी महिलांनी आंदोलन छेडले होते. ग्रामस्थांच्या तिव्र भावना लक्षात घेता प्रशासनाने या दुकानाला सील ठोकले. दरम्यान ३ जून रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. मात्र ग्रामसभेला महिलांची ५० टक्के उपस्थिती आवश्यक होती. कोरम पूर्ण झाला नसल्याने दारू दुकान बंद व्हावे, अशी मागणी करणाऱ्या महिलांची निराशा झाली. दारू विक्रीचे दुकान बंद करण्याचा निर्णय होणार नाही, तोपर्यत मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका महिलांनी घेतली. परिणामी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दारु विक्री दुकानाचा निर्णय राखून ठेवला आहे. मात्र गावात देशी दारु विक्रीचे दुकान नको, या मागणीचे निवेदन बुधवारी कोकर्डा येथील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असेही महिला म्हणाल्या. याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणाले. उमा कडू, माला वानखडे, स्मिता वानखडे, इंदिरा दांडगे, प्रतिभा पवार, प्रतिभा काटकर आदी महिला उपस्थित होत्या.
कोकर्डा देशी दारूचा तिढा जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात
By admin | Updated: June 8, 2017 00:08 IST