साठेबाजांची गय नाही, ग्राम बीजोत्पादन मोहीम व्यापक करा, आमदारांच्या सूचना
धामणगाव रेल्वे : बियाणे, खत, औषधी तसेच शेतीला लागणाऱ्या साहित्याची साठेबाजी केली आणि प्रशासकीय यंत्रणेने अभय दिले, तर अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा सूचना आ. प्रताप अडसड यांनी दिल्या.
धामणगाव, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यांतील खरीप हंगामपूर्व नियोजनासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची ऑनलाईन मीटिंग आ. प्रताप अडसड यांनी मंगळवारी घेतली. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक तक्रारी तलाठी, कृषिसहायक, वीज मंडळ तसेच ग्रामसचिव यांच्याबाबत असतात. या तक्रारी त्वरित निकाली काढण्यासाठी तालुका यंत्रणेने गावातच समिती स्थापित करावी. शेतकऱ्यांना छोट्या-मोठ्या तक्रारींकरिता तालुक्याच्या ठिकाणी येण्याची गरज पडू नये. मतदारसंघांमधील तिन्ही तालुक्यांमध्ये जास्तीत जास्त बियाण्यांची उपलब्धता करण्याचा प्रयत्न करावा. खरीप हंगामात लागणारे सोयाबीन, कपाशी, तूर तसेच सोयाबीन ग्राम बीजोत्पादन मोहीम अधिक व्यापक करावी, असे निर्देश आ प्रताप अडसड यांनी दिले. शेतकऱ्यांना गटातटात विभागून वागणूक देऊ नये, असेही आ. प्रताप अडसड यांनी बजावले. या तालुकानिहाय ऑनलाईन मीटिंगला स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी, महसूल, पंचायत समितीमधील अधिकारी उपस्थित होते .