कार्यालयाला जंगलाचे स्वरुप : पार्किंगची अव्यवस्था, झाडे सुकण्याच्या स्थितीत मनीष कहाते अमरावती येथील भातकुली पंचायत समितीच्या आवारात अनेक कार्यालये आहेत. सुमारे दोन एकर आवारातील रस्ता पूर्णपणे उखडला आहे. जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अस्तव्यस्त पार्किंगमुळे संपूर्ण आवारात वाहनांच्या आडव्या-उभ्या रांगा लागल्या आहेत. रस्त्याचे काम केव्हा होणार, कोण करणार याची माहिती कोणत्याच कार्यालयाला नाही. पंसचा सर्वात मोठा शिक्षण विभाग, जिपचा कृषी विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि भातकुली पंचायत समिती इत्यादी कार्यालये आहेत. रोज जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अभ्यागत आपली विविध कामे घेऊन येथे येतात. आवाराच्या आत प्रवेश करताच मुख्य दाराजवळच भलामोठा खड्डा आहे. डाव्या बाजूला जि.प.चा कृषी विभाग आहे. कृषी विभागाच्या आवारात वाळलेली झाडे आणि कचऱ्याचा ढीग येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत दरवाजे तुटलेले आहेत. तेथील कर्मचारी दुपारचे जेवण आटोपले की चक्क खिडकीतून हात धुतात. त्यामुळे घाण पसरली आहे. पंचायत समिती कार्यालयासमोर रेती आणि गिट्टीचे ढिगारे पडलेले आहेत. रस्त्यावरील डांबर बेपत्ता असून शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेर शेकडो वाहनांच्या अस्तव्यस्त रांगा लागल्या आहेत. समोरच पाण्याची डबकी साचली आहेत. डबक्यातील पाणी वाहनांमुळे अंगावर उडत आहे. रस्त्याच्या बाजूला लावलेले झाडे पूर्णपणे सुकलेले आहे. टोलेजंग बांधकाम असलेल्या सभागृहाला चारही बाजूने घाणीने वेढल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. माझ्या कार्यालयाची हद्द गेटपर्यंत आहे. रस्त्याच्या प्रस्तावासंदर्भात माहिती नाही. वाहने कर्मचारी व्यवस्थितच ठेवतात. - उदय काथोडे कृषीविकास अधिकारी जि.प.अमरावती. रस्त्याच्या कामाबाबत प्रस्ताव कोणाकडे आहे याची माहिती घेतो. झाडे कशी जगवायची, याचे नियोजन सुरू आहे. - सागर पाटील गटविकास अधिकारी पंचायत समिती, भातकुली.
भातकुली पंचायत समितीत खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2017 00:21 IST