चार आरोपी अटकेत : महादेव खोरीजवळील एक्सप्रेस हायवेवरील घटना अमरावती : नवर्षात मौजमस्ती करण्याच्या उद्देशाने पाच युवकांनी चाकूच्या धाकावर दुचाकीचालकासह दोन ट्रकचालकांला लुटले होते. याप्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी मंगळवारी रात्री चार आरोपींना अटक केली आहे. रिंकेश नरेंद्र नानोटकर (१९,रा. फे्रजरपुरा), अमन बाबाराव देवळेकर (१९), कल्लू ऊर्फ अंकुश पाल (२०) व अमित सुधाकर कांबळे (२५, रा.सर्व यशोदानगर न.१) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. रविवारी दुपारी महादेव खोरीजवळील एक्सप्रेस हायवेवर बुधवारा येथील रहिवासी अमोल राजेंद्र फणसे (१९) व दोन ट्रक चालकांना आरोपींनी चाकुच्या धाकावर लुटले. तिघांकडून ३२ हजारांची रोख आरोपींनी हिसकावून घेतली होती. याप्रकरणात पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व पोलीस निरीक्षक पी.एस.वंजारी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय राम गित्ते, एएसआय गजानन डोईफोडे, पोलीस हवालदार राजू सायगन, वचन पंडित व दीपक पवार यांनी तक्रारकर्त्यांनी दिलेल्या वर्णणावरून व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्याच दिवशी पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आरोपी पळून गेले. पोलिसांनी शिताफीने तपास कार्याला वेग देऊन मंगळवारी रात्री तिनही आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपीजवळून एक दुचाकी जप्त केली असून आरोपींनी लुटलेले पैसे खर्च केल्याचे समजते. चारही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील चौकशी पोलीस करीत आहे. अभियांत्रिकीचा विद्यार्थी याप्रकरणातील रिकेश नानोटकर हा आरोपी शहरातील प्रसिद्ध अंभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. १ जानेवारी रोजी पाचही आरोपींनी दारू पिऊन लुटमारीचा प्लॅन बनविला होता. पळून जाताना पुलावरून घेतली उडी घटनेच्या दिवशी पाचवा आरोपी साहिल खान इब्राहिम खान (२५,रा. लुबिनी नगर) हा पोलिसांना पाहून पळून गेला होता. मात्र, त्याने एक्सप्रेस हायवेवरील एका पुलावरून खाली उडी घेतल्याने त्याच्या पायाचे हाड मोडले होते. त्याच्या साथीदारांनी त्याला नागपूर येथील रुग्णालयात हलविले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. फे्रजरपुरा पोलिसांचे पथक साहिलची चौकशी करण्याकरिता नागपूर रवाना झाले आहे.
नववर्षात मौजमस्ती करण्यासाठी केली लुटमार
By admin | Updated: January 5, 2017 00:18 IST