अमरावती: दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात भेडसावणाऱ्या पाणीटंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनासाठीचा टंचाई आराखडा अद्यापही रेंगाळला आहे. त्यामुळे शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत अध्यक्षांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांत सर्वाधिक पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. याशिवाय इतरही गावांत पाणीटंचाईची समस्या भेडसावत असते. या अनुषंगाने झेडपी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दरवर्षी डिसेबर महिन्यात पाणीटंचाईचा संभाव्य आराखडा तयार केला जातो. परंतु, आता दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लोटून गेल्यावरही टंचाई आराखडा तयार करण्यात आलेला नाही, विशेष म्हणजे, सध्याच काही गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे अशा गावांत उपाययोजना करताना अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेता जि.प. अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना आराखड्याला एवढा उशीर का केला, असा प्रश्न उपस्थित करीत ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता कोरोना संसर्गामुळे पंचायत समिती स्तरावर आमदारांच्या बैठकी होवू शकल्या नाहीत. त्यामुळे आराखड्याला उशीर झाल्याचे सभागृहात सांगितले.
दरम्यान, येत्या आठवडाभरात टंचाई आराखडा तयार करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. याशिवाय घरकुलाच्या लाभार्थ्यांना जागा खरेदीबाबतच्या विषयावरही सभेत वादळी चर्चा करण्यात आली. सोबतच २०१२ पूर्वीचे अतिक्रमण नियमाकुलाबाबतही प्रशासनाकडून कारवाई संथगतीने केली जात असल्याने अशी सर्व प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश सदस्य रवींद्र मुंदे यांच्या मागणीच्या अनुषंगाने अध्यक्षांनी प्रकल्प संचालकांना दिले आहेत.
यावेळी अन्य विभागांच्या विषयांवर चर्चा करून विषय मंजूर करण्यात आले. सभेला अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, माजी अध्यक्ष नितीन गोंडाणे, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य सुनील डी. के. अभिजित बोके, सीईओ अमोल येडगे, डेप्युटी सीईओ प्रशांत थोरात आदी उपस्थित होते.
बॉक्स
जलव्यवस्थापनमध्येही चर्चा
जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा २६ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन आयोजित केली होती. या सभेत जलसंधारण विभागाच्या तसेच पाणीपुरवठा विभागाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मागील सभेचे कार्यवृत्त वाचून कायम करण्यात आले. यावेळी सभेचे कामकाज जलसंधारण अधिकारी शिरीष तट्टे यांनी पाहिले.