हवामान तज्ज्ञांचा अंदाज : काही दिवस ठिकठिकाणी तुरळक पाऊसअमरावती : मान्सूनची धुरा सध्या उत्तरेकडे सरकल्याने हिमालयाच्या पायथ्याशी मान्सून सक्रिय आहे. त्यामुळे काही दिवस विदर्भात तुरळक हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यास २७ आॅगस्टनंतर पुन्हा मध्य भारतात पाऊस वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञानी वर्तविली आहे. जिल्ह्यात अपेक्षित सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. आतापर्यंत ६०९.४ मि.मी. पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाकडून नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याच्या प्रतिक्रिया उमटत असल्या तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने वातावरणात उकाडा कायमच आहे. मध्यतंरी काही ठिकाणी तुरळक पावसांची नोंदी झाल्या आहेत. मात्र, बऱ्याच ठिकाणी पावसाने दांडीसुध्दा मारली आहे. सद्यस्थितीत अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नसल्यामुळे काही दिवस विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस होत राहील, असे हवामान तज्ज्ञांंचा अंदाज आहे. विदर्भ मराठवाड्यावर हलके ते मध्यम ढगाचे आच्छादन आहे. मान्सूनची धुरा (आस) अमृतसर-वर्दवान-धुबळी-मणिपूर अशी असून तामिळनाडू ते केरळ किनारपट्टी व उत्तर बिहारवर चक्राकार वारे आहेत. यामुळे काही दिवस विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसांची शक्यता आहे. स्थिती बदलल्यास २७ आॅगस्टनंतर धुंवाधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.
२७ आॅगस्टनंतर बरसणार पाऊस
By admin | Updated: August 25, 2015 00:24 IST