लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील काही महिन्यांपासून जिल्हा परिषद शाळांच्या शिकस्त इमारती व वर्गखोल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशातच आता पावसामुळे तर या इमारती आणि वर्गखोल्यांची वाईट अवस्था झाली आहे. या मुद्यावर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या आमसभेत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला.मागील काही दिवसांपासून पावसाने जिल्हाभरात कहर केला आहे. जोरदार पावसामुळे जिल्हा परिषद शाळा इमारती आणि वर्गखोल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे, तर काही ठिकाणी शाळांमध्ये पाणी गळत असून, अनेक ठिकाणी छत नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना उघड्यावर बसावे लागत आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शिकस्त वर्गखोल्या व इमारतीची कामे तातडीने करावी, अशी मागणी सभेत सदस्य आक्रमक झाले होते. याशिवाय वलगाव येथील पीएससीला संरक्षण भिंत नसल्याने तातडीने उपाययोजना कराव्यात. कुंड सर्जापूर येथील पुनर्वसनाच्या ठिकाणी वीज खांब कोसळले आहेत. ते दुरुस्त करावे आदी मुद्दे सदस्य गजानन राठोड यांनी मांडले. शरद मोहोड यांनी समाजकल्याणच्या वसतिगृहातील गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. अपर वर्धा धरणातील पाणी प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून देण्यात यावे. पिण्यासाठी, शेती व त्यानंतर उद्योग या क्रमानुसार द्यावे. मात्र, प्रशासनाने यात बदल करून सोफिया उद्योगाला पाणी दिले आहे. त्यामुळे सदर पाणीपुरवठा बंद करावा, अशी मागणी सदस्य देवेंद्र भुयार यांनी केली. तसा ठरावही पारित करण्यात आला आहे. याशिवाय झेडपीच्या विश्रामगृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, अशी मागणी प्रवीण तायडे, महेंद्र गैलवार यांनी केली. ही मागणीही मंजूर करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाºया सर्व जुन्या व नवीन इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करण्याची मागणी सदस्यांनी केली. यावर बांधकाम विभागाने सहमती दर्शवित याची अंमलबजावणी सुरू केल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत गावंडे यांनी सांगितले. या कामासाठी आराखडा तयार करून तो जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला जाणार आहे.संत्राझाडांच्या नुकसानभरपाईचा ठरावजिल्हाभरातील संत्राबागा पाण्याअभावी पूर्णत: वाळल्या आहेत. परिणामी संत्राउत्पादक शेतकऱ्यांनी संत्राझाडे तोडावी लागली आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानाचे कृषी विभागाने सर्वेक्षण करू न पंचनामे करावे व संत्राउत्पादक शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी, असा प्रस्ताव सदस्य देवेंद्र भुयार, विक्रम ठाकरे यांनी मांडला. याला भाजप सदस्य सारंग खोडस्कर यांनी अनुमोदन दिले. सदर ठराव पारित करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी प्रशासनाला दिलेत.सायन्स कोअर प्रवेशद्वाराला नावशहराच्या मध्यभागी असलेल्या आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सायन्स कोअर मैदानाच्या रुक्मिणीनगराकडील बाजूस असलेल्या मैदानाच्या प्रवेशद्वाराला माजी आमदार दिवंगत संजय बंड यांचे नाव देण्याबाबतचा ठराव जिल्हा परिषदेच्या आमसभेत एकमताने पारित केला आहे. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सदस्य विठ्ठल चव्हाण,गणेश सोळंके यांच्या ठरावाला बबलू देशमुख यांनी अनुमोदन दिले.
जीर्ण वर्गखोल्यांचा मुद्दा आमसभेत गाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 01:23 IST
मागील काही महिन्यांपासून जिल्हा परिषद शाळांच्या शिकस्त इमारती व वर्गखोल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशातच आता पावसामुळे तर या इमारती आणि वर्गखोल्यांची वाईट अवस्था झाली आहे. या मुद्यावर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या आमसभेत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला.
जीर्ण वर्गखोल्यांचा मुद्दा आमसभेत गाजला
ठळक मुद्देजिल्हा परिषद : सदस्यांनी वेधले पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे लक्ष