सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांची माहिती : आयुक्तांनी आरंभिली कारवाई, लवकरच अंमलबजावणीअमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज विद्यामंदिर या शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश अखेर जारी झाले आहेत. राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर समाजकल्याण आयुक्त पीयूष सिंग यांच्या स्तरावरून आश्रमातील विद्यालयाची मान्यता खारीज करण्याची नोटीस जारी करण्याची प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली. लवकरच या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. सदर शाळेतील विद्यार्थी तथा तेथील कर्मचाऱ्यांचे नजीकच्या संस्थेमध्ये समायोजन करण्यात येणार असल्याचीही माहिती दिलीप कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कांबळे यांनी २० आॅगस्टला नागपूर येथील रुग्णालयात जाऊन प्रथमेशची सांत्वनापर भेट घेतली होती. प्रकरणाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. ज्या शाळा परिसरामध्ये हा प्रकार घडला त्या शाळेची मान्यता रद्द करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. त्या अनुषंगाने समाजकल्याण आयुक्तांनी शंकर महाराज आश्रम ट्रस्टअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या श्री संत ‘शंकर महाराज विद्यामंदिर या शाळेच्या संचालकांना तथा अधिनस्त यंत्रणेला नोटीस बजावली आहे. ‘लोकमत’ने शोधपत्रकारितेच्या माध्यमातून हे गंभीर गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल शासनाच्यावतीने ना. दिलीप कांबळे यांनी प्रथमेशच्या भेटीदरम्यान ‘लोकमत’चे आभार मानले होते. प्रथमेशच्या इलाजाचा पूर्ण खर्च शासन करेल आणि अमरावती किंवा नागपूर येथील उत्तमोत्तम शाळेत त्याला प्रवेश मिळवून दिला जाईल, त्यासाठीचा खर्च शासनातर्फे केला जाईल, अशी घोषणाही ना. दिलीप कांबळे यांनी केली होती. त्यानंतर तातडीने सूत्रे हलली. समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव सुरेंद्र बागडे यांनी त्यानंतर अमरावतीला भेट दिली. सदर प्रकरणाचा इत्यंभूत अहवाल त्यांनी मागितला होता.
शाळा मान्यता खारीज करण्याची नोटीस जारी
By admin | Updated: August 28, 2016 23:55 IST