महापालिका निवडणूक : ग्रामीण भागातही अँड्रॉईड मोबाईलचा अधिक वापर अमरावती : महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. त्यातून इच्छुकांच्या समर्थकांमध्ये थेट फेसबुक आणि व्हॉटस्अॅपवर चकमकी होऊ लागल्या आहेत. फेसबुकवर स्वतंत्र वॉल तर व्हॉट्सअॅपवर ग्रुपिंगने स्पर्धेत रंग भरण्यास सुरुवात केली आहे. प्रभागा-प्रभागांतील इच्छुक व्हॉटस् अॅपचे एडमिन म्हणून नव्या भूमिकेत शिरले आहेत. अमरावती महापालिका निवडणुकीची प्रभागरचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय ज्वर चढण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांनी खुबीने केलेला सोशलमीडियाचा उपयोग सर्वश्रृत आहे. तोच कित्ता महापालिका निवडणुकीच्या रिंगणात गिरवला जात आहे. अॅन्ड्रॉईड मोबाईलच्या माध्यमातून शहर तथा ग्रामीण भागातही सोशल मीडियाचा प्रसार होऊ लागला आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील सोशल मीडियाची व्याप्ती लक्षात घेता या माध्यमाचा सदुपयोग करण्यास अनेकजण सरसावले आहेत. विद्यमान नगरसेवकांपैकी काहींनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर मागील साडेचार वर्षे केलेल्या विकासकामांची टिप्पणी टाकून आगामी निवडणुकीतही आपण रिंगणात राहू, असे संकेत दिले आहेत. मागील लोकसभा निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचे महत्त्व सर्वच राजकीय पक्ष, पुढाऱ्यांना समजले आणि या माध्यमाचा वापर सुरू झाला. सोशल मीडियावरून स्वत:चा प्रचार अथवा ‘पर्सनल रिलेशन’ वाढविण्यासाठी सर्वच इच्छुकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या सर्जिकल स्ट्राईकपासून अगदी छोट्या-मोठ्या घटनेवर हे इच्छुक आपली प्रतिक्रिया ‘पोस्ट’ करीत होते. आपल्या नेत्याचे अनुकरण करण्यात त्यांचे समर्थकही पाठीमागे राहिले नाहीत. नेतेमंडळी आणि त्यांच्या समर्थकांकडून टाकण्यात येणाऱ्या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदविण्यात येत आहेत. फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना परस्परांची उणीदुणी काढण्याचे प्रकार वाढत असून त्याचा फटका कायदा व सुव्यवस्थेला बसू नये, याची काळजी मात्र पोलिसांना घ्यावी लागत आहे. (प्रतिनिधी)सोशल मिडिया विशेष करुन व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर प्रतिक्रिया देताना, कुठलीही पोस्ट टाकताना नागरिकांनी काळजी घ्यावी, कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्यास गुन्हा तर दाखल होईलच, शिवाय अॅडमिनलाही कारवाईला सामोरे जावे लागेल. - कांचन पांडे, प्रमुख सायबरसेल, पोलीस आयुक्तालय
इच्छुकांमध्ये ‘सायबर वॉर’ व्हॉट्सअॅपवर ग्रुपिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 00:22 IST