मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला बँकांचा खो : खरिपाच्या पीककर्जातून कापले जाताहेत गतवर्षीचे व्याज, गजानन मोहोड अमरावतीगतवर्षीच्या खरीप हंगामात विदर्भाची आणेवारी ५० पैशांच्या आत आल्याने शासनाने ११ डिसेंबर २०१४ रोजी नागपूरच्या विधीमंडळ अधिवेशनात ७ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. यामध्ये खरीप २०१४ मधील पीककर्जावरील व्याजाचा भरणा करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात घोषणेची अंमलबजावणीच नसल्याने बँकांनीदेखील शासनाला न जुमानता यंदाच्या पीककर्जातून गतवर्षीचे व्याज कपात करण्याचा सपाटा सुरु केला आहे. ऐन पेरणीच्या कालावधीत या नव्या संकटाने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. विदर्भातील दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने ७ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यामुळे जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ५६४ शेतकऱ्यांना आंशिक दिलासा मिळाला. यामध्ये १ लाख २० हजार ५६४ शेतकऱ्यांना खरीप २०१४ मधील ११२० कोटी ३८ लाख ८७ हजार रुपयांच्या पीककर्जावरील व्याजाचा भरणा शासन करेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. प्रत्यक्षात शासनाव्दारा व्याजाचा भरणाच करण्यात आला नसल्याने बँकांनी खरीप २०१५ करिता शेतकऱ्यांना पीककर्ज देताना कर्जामधून थेट गतवर्षीच्या पीककर्जाचे व्याज कपात सुरू केली आहे. गतवर्षीचे व्याज माफ झाले या भावनेत असणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांनी व्याजकपात करुन धक्का दिला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या २९ जूनच्या अहवालानुसार जिल्ह्यात बँकांना खरीप २०१५ करिता १६९५ कोटी ४४ लाख रुपयांचे टार्गेट असताना केवळ ८५३ कोटी ३५ लाख २२ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. ही टक्केवारी एकूण उद्दिष्टांच्या केवळ ५० टक्केच आहे.या कर्जावरील अद्याप व्याजमाफी नाहीखरीप २०१४ करीता जिल्ह्यात, सहकारी बँकेने ५८ हजार ४८५ शेतकऱ्यांचे ४३४ कोटी ९३ लाख ८७ हजार, राष्ट्रीयीकृत बँकांनी ६१ हजार २७८, शेतकऱ्यांना ६७८ कोटी ३३ लाख व ग्रामीण बँकांच्या ८०० शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या ७१२ कोटी रुपयांचे असे एकूण ११२० कोटी ३८ लक्ष ८७ हजारांच्या खरीप कर्जावरील व्याजमाफीची रक्कम अद्याप आली नसल्याचे बँकांनी स्पष्ट केले आहे. गतवर्षीच्या खरीप पीककर्जाची व्याज माफी करण्याची घोषणा शासनाने केली असली तरी बँकांना रक्कम मिळाली नाही. त्यामुळे व्याजकपात करण्यात येत आहे. शासनाची रक्कम मिळताच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल. - अनंत खोरगडे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक,सेंट्रल बँक आॅफ इंडिया.शेतकऱ्यांच्या पीककर्जावरील व्याजमाफी हा शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. सध्या महसूलमंत्री ना. एकनाथ खडसे परदेशात आहे. ते आल्यानंतर त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करुन प्रसंगी शासनावर दडपण आणू. - सुनील देशमुख, आमदार, अमरावती.
माफीच्या निर्णयानंतरही व्याजकपात सुरुच
By admin | Updated: June 30, 2015 00:34 IST