तिवसा : सततच्या पावसामुळे रस्त्याच्या कडांवरून ओघळणारे पाणी ठाणाठुणी, वरखेड शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात आले आहे. त्यामुळे शेतीला जलाशयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे डिझेल इंजिन लावून शेतातून पाण्याचा उपसा करावा, अशी मागणी वरखेड येथील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार अजिनाथ गांजरे यांच्याकडे केली.
अतिरिक्त पाण्याचा फटका तूर, सोयाबीन या पिकांना बसला. पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले. त्यामुळे शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणीदेखील निवेदनात शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांनी शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस डिझेल इंजिन लावले. मात्र, याचा काही फायदा झाला नाही. या भागातील शेकडो हेक्टरमधील सोयाबीन व तूर पीक अतिपावसामुळे करपल्याचे दिसून येत आहे. पिके पाण्यात बुडाली आहेत. काढणीस आलेले सोयाबीन गेले, कपाशीलाही फटका बसला आहे. वरखेड येथील विठ्ठल बोके, संदीप गोरडे, छाया खैरकर, प्रदीप गोरडे, धीरज नाकाडे, नितीन चौधरी, श्रीमती सुनंदाबाई बोके, माधवी बोके, कुंदा जगताप भूषण बोके, राजू देशमुख तसेच आडकुजी महाराज संस्थानची शेती या ठिकाणी पाणी शिरल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी निवेदन दिले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अभिजित बोके, राजू देशमुख, संदीप गोरडे, सागर सौंदरकर, नीलेश बोके, धीरज नाकाडे, रोशन तरसे उपस्थित होते.