अमरावती : शहरात विना परवानगीने सुरू असलेल्या अवैध बांधकाम निर्मितीची पाहणी सोमवारी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केली. यावेळी इतवारा बाजारातील जुनी इमारत पाडून त्या जागी विनापरवानगीने सुरू करण्यात आलेले बांधकाम लक्ष्य करण्यात आले आहे.अवैध बांधकाम आणि अतिक्रमणाची शोधमोहीम घेताना स्थानिक जवाहर गेट मार्गावरील आराधना शोरुम, दुल्हे राजा, राजधानी या प्रतिष्ठानांनी विना परवानगीने निर्माण केलेल्या बांधकामाची पाहणी आयुक्तांनी केली. तसेच रस्त्यालगत असलेले अतिक्रमणाचे निरीक्षण करताना ते लवकरच हटविले जाणार, असा निर्णय त्यांनी घेतला आहे. यावेळी त्यांच्या समवेत अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे उपस्थित होते. इतवारा बाजारात जुनी इमारत परवानगी न घेता ती जमिनदोस्त करण्यात आल्याचे आयुक्त गुडेवार यांच्या लक्षात आले आहे. सदर प्रतिष्ठानांना नोटीस बजाविली जाईल. (प्रतिनिधी)
आयुक्तांनी केली अवैध बांधकामांची पाहणी
By admin | Updated: September 15, 2015 00:20 IST