मका घेतल्याशिवाय इतर धान्य नाही : महसूल प्रशासनाचे दुकानदारास अभय
मोर्शी : शहरातील विद्या कॉलनीत असलेल्या स्वस्त धान्य दुकान नंबर ७१ मध्ये शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट मका वितरित करण्यात येत आहे. महसूल प्रशासनाच्यावतीने त्यात दुकानदाराने फेरफार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मोर्शी येथील खरेदी विक्री संघाने डिसेंबर २०२० व जानेवारी २०२१ मध्ये शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी जवळपास दहा हजार क्विंटल मका खरेदी केला व खरेदी केलेला मका येथील गोडाऊन कीपरच्या ताब्यात देऊन तो येथील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानामध्ये पाठवण्यात आला. परंतु फेब्रुवारी महिन्याच्या वाटपामध्ये येथील एका दुकानात निकृष्ट मका आढळून आला. तो मका जनावरांनासुद्धा खाण्यायोग्य नव्हता. यामुळे रेशन कार्ड वर मका देऊ नका, अशी ओरड सुरू झाली. परंतु, मका घेतल्याशिवाय इतर धान्य मिळणार नाही, अशी दुकानदाराने ताकीद दिल्याने काही ग्राहकांनी मक्याचे पैसे दिले. परंतु, मका घेतला नाही. तहसीलचच्या अन्नपुरवठा विभाग व महसूल प्रशासनाने त्याकडे दुुर्लक्ष चालविले आहे.
कोट
मोर्शी खरेदी विक्री संघाने मका खरेदी केला आहे. तो गोडाऊन कीपरच्या ताब्यात दिला. मका ए ग्रेडमध्येच खरेदी केला. परंतु, त्या दुकानांमध्ये निकृष्ट मका कसा आला, याबाबत चौकशी करू.
- विलास मुसळे, अन्नपुरवठा निरीक्षक, तहसील, मोर्शी