लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वातंत्र्यदिनी गणवेश परिधान करून शाळेत जाण्याचे स्वप्न पाहणाºया इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे हे स्वप्न साकार होणार नसल्याचे चित्र आहे.१५ आॅगस्टला शाळांच्या मैदानात गणवेशात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्याच्या साक्षीने ध्वजारोहण होत असते. दरवर्षीचा हा अनुभव यंदा मात्र विद्यार्थ्यांना घेता येणार नाही. गणवेश पुरविण्याच्या धोरणात शासनाने केलेल्या बदलामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. गणवेश खरेदीसाठी पालकांना प्रत्येकी दोनशे रूपयेप्रमाणे चारशे रूपये अनुदान दिले जाणार आहे. पण, व्यावहारिक त्रुटींमुळे योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र जि.प. शाळांमध्ये दिसून येत आहे.पूर्वी गणवेशाची रक्कम संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा केली जात होती. शाळा समितीच्या शिफारसीवरून गणवेशाची खरेदी करण्यात येत होती. मात्र, यात भष्टाचार होत असल्याच्या तक्रारी शासनाला मिळाल्याने योजनेत बदल करण्यात आला. आता पालकांनी गणवेश खरेदी करून देयक शाळेत सादर केल्यास विद्यार्थी-पालकांच्या संयुक्त खात्यात चारशे रूपये जमा केले जातात.खात्यासाठी हजार रुपयांचा खर्चगणवेशासाठी विद्यार्थी व त्याच्या आईच्या नावे संयुक्त खाते उघडावे लागते. त्यासाठी किमान १ हजार रूपये खर्च येतो. कारण काही रक्कम खाते उघडताना बँकेत जमा ठेवावी लागते. दुसरे म्हणजे दोनशे रूपयांत एक गणवेश होतच नाही. म्हणजेच पालकांना त्यांच्या जवळचे पैसे टाकून गणवेश खरेदी करावे लागतात. जिल्ह्यात दीड हजारांवर शाळा असून १ लाख १८ हजार ७४६ विद्यार्थी गणवेशासाठी पात्र ठरले आहेत. गणवेश खरेदीसाठी ४ कोटी ७४ लाख ९८ हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.अनंत अडचणीग्रामीण भागातील पालकांना गणवेश खरेदीसाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. ही बाब परवडण्यासारखी नाही. ग्रामीण भागात मजूर, शेतकरी व आदिवासींची आर्थिक परिस्थिती जादाची गुंतवणूक करण्याची नाही. त्यामुळे गणवेश खरेदी करण्याच्या भानगडीत पालक पडत नाहीत. काही अपवादात्मक शाळांमध्ये शंभर टक्के गणवेश विद्यार्थ्यांनी घेतल्याचे शिक्षण विभाग सांगत आहे. प्रत्यक्षात अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी केला नसल्याचे चित्र आहे.गणवेशासाठी विद्यार्थी व आईचे बँक खाते काढताना काही अडचणी होत्या. ग्रामशिक्षण समितीमार्फत गणवेश खरेदीसाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत- जयश्री राऊतप्रभारी शिक्षणाधिकारीप्राथमिक
गणवेशाविनाच विद्यार्थी साजरा करणार स्वातंत्र्यदिन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:03 IST